‘ती’चा रात्रीचा प्रवास धोक्याचाच!
By admin | Published: May 5, 2015 03:21 AM2015-05-05T03:21:47+5:302015-05-05T03:21:47+5:30
येरवडा पोलिसांकडे अशी एक तक्रार नुकतीच आली आहे. प्रवासात दोन बहिणींवर हा प्रकार ओढावला. त्याची हकीकत संबंधित मुलींनी चाईल्डलाईन हेल्पलाईनला कळवली.
येरवडा पोलिसांकडे अशी एक तक्रार नुकतीच आली आहे. प्रवासात दोन बहिणींवर हा प्रकार ओढावला. त्याची हकीकत संबंधित मुलींनी चाईल्डलाईन हेल्पलाईनला कळवली. त्याची गांभीर्याने दखल घेत चाईल्डलाईनने येरवडा पोलिसांकडे या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला. या घटनेमुळे पुण्यासह राज्यातील एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बसमध्ये महिलांची छेडछाडी होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
राज्याच्या विविध भागांमधून मुली, महिला शिकण्यासाठी, नोकरीसाठी पुणे-मुंबई किंवा शहरांकडे धाव घेतात. आपल्या गावी परतताना किंवा गावाहून शहराकडे येताना अंतराचे आणि वेळेचे गणित बसविण्यासाठी रात्रीची वेळ निवडली जाते. नोकरी-शिक्षणामुळे कुटुंब सोडून आलेल्या मुलींना कैकवेळा एकटीनेच प्रवास करावा लागतो. पण अनेकदा या एकट्या महिलेला रात्री बसमध्ये विनयभंग, छेडछाडीच्या प्रसंगांना, घाणेरड्या नजरा, लगट करण्याच्या प्रकाराला बळी जावे लागते.
अनेकदा महिला इच्छितस्थळी उतरल्यानंतर आपल्यावर ओढावलेला प्रसंग गांभीर्याने घेत नाहीत व त्याबाबत तक्रारही नोंदवत नसल्याचे चित्र आहे. दुुर्दैवाने, बसमधील इतर प्रवासी या महिलांच्या मदतीसाठी पुढाकार घेत नसल्याचेही वास्तव आहे. याचा परिणाम म्हणजे बसचालक, वाहक, सहायक व काही पुरुष प्रवासी निर्ढावतात. आपल्याला विरोध होत नाही, तक्रार केली जात नाही याचा गैरफायदा घेऊन अशाच प्रकारे ते इतरही मुली-महिलांची छेड काढण्यास उद्युक्त होतात. अशाच घटनांतून त्यांचे धाडस वाढते आणि बलात्कारासारख्या घटना घडत आहेत.