कॅन्सरवर मात करून ती पुन्हा झाली शिक्षण घेण्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 01:43 PM2019-11-07T13:43:06+5:302019-11-07T13:44:50+5:30
दहावीची परीक्षा दिल्यानंतर तिला कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचे संकट ओढावेल असं कधीही वाटलेही नव्हते...
अतुल चिंचली-
पुणे : शालेय शिक्षण घेणारी शेतकरी कुटुंबात राहणारी सतरा वर्षांची प्रियंका (नाव बदलले आहे ). नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तिला कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचे संकट ओढावेल असं कधीही वाटलेही नव्हते. परंतु कॅन्सरची लक्षणे आढळून आली. तिला कॅन्सर झाला असे समजले. समवेदना संस्थेचा आधार मिळाला आणि कॅन्सरसारख्या ओढवलेल्या संकटावर मात करून प्रियंका पुन्हा शिक्षणासाठी तयार झाली.
सोलापूर जिल्ह्यात म्हाडा तालुक्यात राहणाऱ्या प्रियंकाची ही कथा आहे. आजी-आजोबा, आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असे सात लोकांचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. वडिलांची लहान शेती असून ते शेतमजुरीची कामेही करतात. तर आई मजुरीची कामे व घरकाम करते. बहीण, भाऊ शाळेत शिकत आहेत. घरातील परिस्थिती फारच साधी होती. मात्र आई-वडिलांनी मुलांना खूप शिकवण्याचे ठरवले.
प्रियंकाने २०१६ च्या मार्चमध्ये दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर ताप येणे, उलट्या होणे अशी लक्षणे आढळून आली. काही दिवसांनी शरीरातील पांढºया पेशी कमी झाल्या. तिने तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर रक्ताचा कॅन्सर असल्याचे कळाले. तिच्यासहित कुटुंबावर मोठे संकट ओढावले. ती खूपच घाबरून गेली. डॉक्टरांनी सांगितले की, कॅन्सर बरा होण्यासाठी तीन वर्षे केमोथेरपी करावी लागेल. कुटुंबीयांनी माघार घेतली नाही. थेरपीला सुरुवात केली. कुटुंबातील लोकांनी आर्थिक मदतीसाठी नातेवाईक, ओळखीच्या लोकांशी संपर्क साधला. कुटुंबीय तीन वर्षांपैकी एक वर्षाच्या थेरपीसाठी पैसे गोळा करू शकले. पण अजून दोन वर्षे थेरपीसाठी आर्थिक मदतीची गरज होती. अशा वेळी पुणे न्यूरोसायन्सेस ट्रस्ट व रिसर्च सोसायटीची समवेदना संस्था गरजंूना मदत करते हे कळाले.
..........
कर्करोगाच्या बाबतीत उपचारांपेक्षाही जास्त महत्त्व आहे वेळेवर निदान होण्याला. समवेदना प्रियंकायारख्या गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्याबरोबरच स्त्रियांसाठी 'कर्करोग पूर्वनिदान तपासणी' उपक्रम चालवते. यातून आजवर हजारो स्त्रियांना लाभ झाला आहे. यातून निदान झाल्यास उपचारासाठी मदत आणि मार्गदर्शनही केलं जातं. -प्रीती दामले, मुख्य कार्यकारी अधिकारी, समवेदना संस्था
.........
त्यावेळी या कुटुंबीयांनी समवेदना संस्थेशी संपर्क साधला. कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे जाणून घेतल्यावर संस्थेने पुढील दोन वर्षांची थेरपी करण्याचे ठरवले. त्या दोन वर्षांतील प्रवासखर्च, औषधे, उपचार सर्व काही संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले.