तिला मिळाला आधार मायेचा आणि शैक्षणिक मदतीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 08:09 PM2018-06-19T20:09:01+5:302018-06-19T20:09:01+5:30
१३ वर्षांपूर्वी मुलगी झाली म्हणून महिलेला मारहाण करून त्यातच तिचा मृत्यू झाला. नुकत्याच जन्मलेल्या मुलीलासुद्धा बापाने नाकारले.....
सहकारनगर : दिवसेंदिवस माणुसकी संपत चालल्याचे अधोरेखित करणाऱ्या अनेक घटना समाजात घडताना दिसत आहे. परंतु, असं म्हटले जाते की समाजात वाईट गोष्टींचा प्रादुर्भाव वाढतो तसे चांगल्या गोष्टी देखील तेवढ्याच ताकदीने निर्माण होत असतात. तसेच काहीसे उदाहरण सहकारनगर येथे समोर आले आहे.१३ वर्षांपूर्वी मुलगी झाली म्हणून महिलेला मारहाण करून त्यातच तिचा मृत्यू झाला. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला बापाने सुद्धा नाकारले. परंतु, चोच देतो तो अन्नाचीही सोय करतो त्याच म्हणीप्रमाणे तिच्या आजींने (आईच्या आईने) आपल्या वारलेल्या मुलीची जबाबदारी स्वीकारली आणि मिळेल ते काम करून त्या मुलीला मोठे करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. आठवीत शिकणाऱ्या अर्पिता बनकर या मुलीची ही गोष्ट आणि तिची आजी प्रभावती वाघुले यांची....!
आदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल माने यांनी हुशार मुलगी अर्पिताला पालकत्व देऊन तिचे उज्ज्वल भवितव्य घडेपर्यंत कायमचे दत्तक घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी अर्पिता भरतनाट्यम नृत्यकला, जिम्नॅस्टिक खेळ , अभिनय क्षेत्रात नाव कमवण्यासाठी धडपडत आहे.
नगरसेविका साईदिशा राहुल माने यांनी तिच्यासह आज तिचे पालक बनून तिची शाळेची फी ड्रेस बूट मोजे बॅग चप्पल जोड व जीवनावश्यक अनेक वस्तूंची खरेदी करून दिली. आदर प्रतिष्ठाण तर्फे आजपर्यंत अनाथ, वंचित व विशेष अश्या ९७ मुलांना आजपर्यंत शैक्षणिक जबाबदारी घेऊन संभाळ केला आहे. वसाहत पातळीवर मुलींना १३ ते १५ वर्षानंतर रोजगार मिळवण्यासाठी न कळत कामाला लावण्याचे प्रमाण आजही शहरात मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते. गेल्या १५ वर्षांपासून प्रत्येक दिवाळीत गरीब, गरजू व अनाथ ५०० मुलांना दिवाळीत त्यांच्या आवडते शैक्षणिक साहित्य, कपडे व मिठाई भेट म्हणून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.