‘ती’ला तिचा मानसन्मान मिळालाच पाहिजे- शीतल उगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:29 AM2018-09-15T00:29:11+5:302018-09-15T00:29:32+5:30

पुरुषाप्रमाणे स्त्रीलादेखील- ‘ती’ला तिचा मानसन्मान मिळाला पाहिजे. यासाठी लोकमतचा ‘ती’चा गणपतीसारखे उपक्रम अत्यंत उपयोगी आहेत, असे मत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

She should get her honor - Sheetal Gogle | ‘ती’ला तिचा मानसन्मान मिळालाच पाहिजे- शीतल उगले

‘ती’ला तिचा मानसन्मान मिळालाच पाहिजे- शीतल उगले

googlenewsNext

गणेशोत्सव हा केवळ ‘तीचा’ किंवा त्यांचा नसून, तो समाजातील प्रत्येक घटकाचा झाला पाहिजे. संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्वांसाठी सुरक्षित व सामाजिक सलोखा वाढविणार हावा. स्त्री आणि पुरुष ही समाजाच्या रथाची दोन चाके असून, एकाला जास्त मान आणि दुसऱ्याला कमी लेखणे योग्य नाही. त्यामुळे पुरुषाप्रमाणे स्त्रीलादेखील- ‘ती’ला तिचा मानसन्मान मिळाला पाहिजे. यासाठी लोकमतचा ‘ती’चा गणपतीसारखे उपक्रम अत्यंत उपयोगी आहेत, असे मत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

पुण्याच्या गणेशोत्सवाला तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. जगात एकमेवाद्वितीय असलेल्या गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक अभिसरण होते. यानिमित्त वेगवेगळ्या समाजांतील लोक मोठ्या संख्येने एकत्र येतात. यातून निर्माण होणाऱ्या शक्तींचा चांगल्या कामासाठी उपयोग होण्याची गरज आहे. पुण्याचा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक, चांगल्या विचारांना पुढे आणणारा, स्त्रियांचे सामाजिक स्थान भक्कम करणारा झाला पाहिजे. लोकमतचा ‘ती’चा गणपती हा अभिनव उपक्रम आहे.
आपला समाज आजही प्रतीकांना महत्त्व देतो. आरतीचे ताट हे शक्तीचे प्रतीक असून, ते महिलांच्या हाती असले पाहिजे. सणासुदीच्या दिवशी मी नवत्र्याला आणि मुलाला औक्षण करते, त्यानंतर त्यांच्याकडून स्वत:ला औक्षण करून घेते. केवळ पुरुषांनाच नव्हे, तर स्त्रीलाही औक्षण करून घेण्याचा अधिकार आहे. महिला या समाजाचा अर्धा हिस्सा असताना त्यांच्या अधिकाराची जाण ठेवायलाच हवी. भेदभाव दूर करण्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायला हवी. जग बदलण्याचा आटापिटा करण्यापेक्षा आपल्या क्षमतेनुसार बदलाची सुरुवात स्वत:पासूनच केली पाहिजे. क्रांती आणि उत्क्रांती यांत फरक आहे. क्रांती पटकन घडते, तर उत्क्रांतीसाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात झाली पाहिजे. मी रायगडला जिल्हाधिकारी असताना मला ‘महिला जिल्हाधिकारी’ म्हणून संबोधले जायचे. यावर मी कायम आक्षेप घेतला. खुर्चीला जेंडर नसते. सार्वजनिक जीवनात वावरताना स्त्री-पुरुष असा भेद बाजूला ठेवलाच पाहिजे. स्त्री म्हणून केवळ कारणे देण्यापेक्षा कामामध्ये आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला, तर बदल नक्कीच घडेल.
समाजात स्त्री आणि पुरुष दोघेही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एकाच्या विरोधात दुसरा, असे स्वरूप निर्माण होणे चुकीचे आहे. स्त्री-पुरुष समानता, स्त्रीला प्रत्येक गोष्टीत तेवढाच मानसन्मान देण्याचे काम घरापासून सुरू केले पाहिजे. घरामध्ये ‘ती मुलगी, तू मुलगा आहेस’ असे वातावरण असले तर पुढे समाजात, सार्वजनिक जीवनातदेखील तेच विचार पुढे जातात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपल्या घरातून झाली पाहिजे. यासाठी खºया अर्थाने महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे.
गणेशोत्सव किंवा अन्य कोणतेही सामाजिक उपक्रम, सण-उत्सवामध्ये स्त्री-पुरुष समानतेसारखे विषय हाती घेऊन समाजप्रबोधनाचे काम करू शकतो. आपल्याकडे पितृसत्ताक परंपरा असल्याने महिलांना कमी मानसन्मान मिळतो, असे बोलले जाते.
यासाठी मातृसत्ताक संस्कृती आणली पाहिजे, असे काही म्हणातात. परंतु, हेदेखील चुकीचे आहे. कोणत्याही एका गोष्टींचे वर्चस्व असणे व दुसºयाला नेहमी कमी लेखणे चुकीचे आहे. आता आपण २१व्या शतकात असून, खºया अर्थाने स्त्री-पुरुष समानात समाजाता आली पाहिजे. यासाठी विविध पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे.

 

 

Web Title: She should get her honor - Sheetal Gogle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.