संघर्ष एका आशेचा! संकटांपुढे न खचता, न हरता ‘ती’ उभी राहिली सामर्थ्याने
By राजू इनामदार | Published: September 8, 2022 11:42 AM2022-09-08T11:42:54+5:302022-09-08T11:42:54+5:30
क्रीडा साहित्याचे दुकान... त्याची शून्य माहिती... पदरात दोन लहान मुले.....
पुणे : आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक असलेल्या पतीचे आकस्मिक निधन झाले. क्रीडा साहित्याचे दुकान... त्याची शून्य माहिती... पदरात दोन लहान मुले... अशात धैर्याने उभे राहत न खचता, न हरता ‘ती’ उद्योगातील सर्व बारकावे शिकून समर्थपणे उभी राहिली. ‘ती’ने कृतीतून समाजासमोर एक आदर्श घालून दिला.
आशा दत्तात्रय शिंदे यांचा हा प्रवास शब्दातून व्यक्त होईल इतका सोपा नाही. विचार करा, सुरेख संसार सुरू आहे. क्रीडा जगतातील प्रसिद्ध खेळाडू, आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रशिक्षक असा पती, क्रीडा साहित्याचे दुकान, दोन छान मुले. असे सगळे सुरू असते आणि अचानक आघात होतो. एका अपघातात पती जायबंदी होतात. त्यांची स्मृती जाते. नंतर त्यांचे निधन होते. अशा वेळी कोणीही साधी महिला खचून गेली असती. माहेरचा, सासरचा असा कोणाचाही आधार घेत उर्वरित सगळे आयुष्य रडतरडत, नशिबाला दोष देत काढले असते. आशा शिंदे यांनी मात्र यातील काहीही केले नाही.
पती नाहीत हे मुळी मनात आणायचेच नाही असे त्यांनी ठरवले. क्रीडा उद्योगातील सगळी माहिती करून घेतली. एका बाईने क्रीडा साहित्याचे दुकान चालवावे ही त्यावेळच्या पुण्यातील भलतीच वेगळी गोष्ट होती. मग क्रीडाशिक्षक यायचे, चेष्टा करू पाहायचे. खेळाडू यायचे, काहीतरी चित्रविचित्र प्रश्न विचारायचे किंवा मग साहित्य मागायचे. क्रीडा साहित्य खरेदीतील भ्रष्टाचार तर डोंगराएवढा. त्यात त्यांनी सहभागी व्हावे यासाठी दबाव टाकायचे. यातील एकाही अनिष्ट प्रकाराला आशा शिंदे बळी पडल्या नाहीत.
ऑस्ट्रेलियामधून मागविलेल्या टेनिस रॅकेटचे गटिंग त्यांनी शिकून घेतले. त्यात त्या इतक्या प्रवीण झाल्या की प्रकाश पडुकोन, कृष्णन असे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू रॅकेट बांधून घ्यायला त्यांच्याकडे येऊ लागले. पती दत्तात्रय शिंदे यांनी सर्व क्रीडा जगतात चांगूलपणाची पेरणी करून ठेवली होती, ती आता उपयोगाला आली. काहींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा जास्त हात मदतीला आले. पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यातूनच मग फक्त पुण्यातीलच नव्हे तर राज्यातील क्रीडा उद्योगातील पहिला महिला हा मान त्यांना मिळाला.
संघर्ष एका आशेचा
फक्त दुकान एके दुकान असे मर्यादित न राहता आशा शिंदे यांनी सार्वजनिक जीवनातही अनेक कामे केली. वाहतूक सुरक्षाविषयक काम करणाऱ्या संस्थांमध्ये सक्रिया झाल्या. ज्येष्ठ नागरिक संघाचे काम सुरू होतेच. उद्योग करतानाच त्यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. दोघेही आज परदेशात स्थायिक आहेत. हा सर्व व्याप सांभाळून आशा शिंदे यांनी भरारी या नावाने पतीचे कर्तृत्व शब्दबद्ध केले. संघर्ष एका आशेचा यात त्यांनी स्वत:चेच अनुभव विषद केले आहेत.