मृत वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नासाठी ‘तिने’ चढवली खाकी वर्दी अंगावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:31 PM2019-03-13T18:31:51+5:302019-03-13T18:33:57+5:30
वडिलांनी भारतीय सैन्य दलामार्फत देशसेवेचे व्रत एकनिष्ठतेने जपले..त्यांनी धाकट्या मुलीत देशसेवेचे स्वप्न पाहिले ..
पुणे : वडिलांनी भारतीय सैन्य दलामार्फत देशसेवेचे व्रत एकनिष्ठतेने जपले..तेथून निवृत्त झाल्यावरही सामाजिक बांधिलकीतून अनेकांच्या रेशीम गाठी जुळवत असंख्य संसार फुलवले. परमेश्वराने त्यांच्या पदरात दिलं तीन मुलींचं दान...पण धाकट्या मुलीत त्यांनी स्वत: स्विकारलेल्या देशसेवेचे स्वप्न पाहिले ..असे हे श्रीकांत गायकवाड.. परंतु, त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले.. या अडचणींना कणखरपणे सामोरे गेले.. या दिवसांमध्येही तिने दिवस रात्र मेहनत घेत राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिराक्षक परीक्षेत अनुसुचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला....या यशस्वी तेजशलाकाचे नाव आहे पूजा गायकवाड..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा श्रीकांत गायकवाड (रा.टिंगरेनगर, पुणे (मूळ- कुंपरवळण, ता.पुरंदर )चे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होऊन एमएससी बायोटेक झाले आहे. तिला दोन मोठ्या बहिणी असून, एकीचे लग्न झाले आहे. पूजा ही लहानपणापासून आभ्यासात हुशार होती. तिच्यात अधिकारी होण्याची क्षमता आहे हे तिच्या वडिलांनी ओळखले होते. परंतु, वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने पीएसआय होण्याचा सल्ला पूजाला दिला, आईच्या मिळालेल्या पाठबळामुळेच पूजाला पोलीस उपनिरीक्षक होता आले. तिच्या या उत्तुंग भरारी मुळे सर्वांनी तिचे भरभरून कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.
..........................
वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज आईच्या पाठबळावर पोलीस दलात अधिकारी झाले आहे, परंतु, आज ते पाहण्यासाठी वडील हयात नाहीत, याचे फार मोठे दुख: मनात व्याकुळ होऊन बसले आहे. पूढे उपविभागीय पोलीस अधिकारी होऊन पीडितांना ख्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पूजाने लोकमत शी बोलतांना सांगितले.