चाळिशीमध्ये ‘ती’ची भारतभर सायकलस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:43 PM2019-12-11T13:43:33+5:302019-12-11T13:46:48+5:30

इंधन नव्हे, कॅलरीज बर्न करण्याचा दिला संदेश...

she tourism of India by Cycle riding | चाळिशीमध्ये ‘ती’ची भारतभर सायकलस्वारी

चाळिशीमध्ये ‘ती’ची भारतभर सायकलस्वारी

googlenewsNext
ठळक मुद्दे पुुण्यातील महिलेची रोमांचक कहाणी

नितीन गायकवाड - 
पुणे : चाळिशीत महिला घरातील कामांमध्ये आणि मुलांच्या संगोपनात वेळ देतात. त्यामुळे स्वत: च्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून जगावे लागते. परंतु, पुण्यातील एका महिलेने चाळिशीत काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास सायकलवर करून ‘स्त्रीशक्ती’चा धडाच दिला आहे. त्या महिलेचे नाव प्रीती दोशी-मस्के आहे. इंधन कमी जाळून, शरीरातील कॅलरिज जाळण्यासाठी सायकल चालवा, असा संदेश त्यांनी दिला. 
त्यांनी नुकतेच काश्मीर ते कन्याकुमारी हे  ३३७३ किमी अंतर हे केवळ १७ दिवस, १७ तास आणि १७ मिनिटे अशा वेळेत ३ डिसेंबर रोजी पार केले.  त्यांच्यासोबत पुण्यातील प्रसन्न कुलकर्णी, डॉ. राकेश जैन यांनी हा प्रवास सायकलवर केला आहे. ‘सेव्ह फ्युएल, बर्न कॅलरिज अ‍ॅण्ड फिट इंडिया’चा नारा घेऊन संपूर्ण भारतातून १५ सायकलपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये यांनीदेखील सहभाग नोंदवला. 
या प्रवासाबाबत दोशी म्हणाल्या, कित्येक वेळा  सायकल दिवसाला पाच-पाच वेळा पंक्चर झाल्या. कधी उणे ३ ते ३५ डिग्री तापमान, थंडी, ऊन-वारा, पाऊस हे सर्व अंगावर झेलत  मोहीम फत्ते केली. सुरुवातीलाच काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे तब्बल २७ तास आमची टीम अडकून पडली होती. पण आम्ही कुठल्याही संकटांपुढे डगमगलो नाही. दररोज २२० किमी अंतर रोज पूर्ण करण्याचे ध्येय होते. प्रत्येक शहरात त्यांचे चांगले स्वागत व सहकार्य मिळाले. 
चाळिशीनंतर एक आवड म्हणून त्यांनी रनिंगला सुरुवात केली आहे.  आता त्यांचे ध्येय ‘आयर्नमॅन’ ही जागतिक स्पर्धा पूर्ण करण्याचे आहे.  
आपण स्वत: सक्षम झालो की समाजही आपल्याला मदत करतोच. महिलांनी ग्रुप करून एकदिवसीय सायकल मोहिमा राबवाव्यात. पुण्याच्या आसपास खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. तेथे महिलांनी ग्रुप करून एकदिवसीय सहली सायकलवर कराव्यात. जेणेकरून महिलांना सायकल चालवतानाच्या एकमेकींच्या समस्या शेअर करता येतील.
......
 प्रीती दोशी-मस्के यांनी पुणे ते पंढरपूर सायकलवर अन् तेही नऊवारी घालून, पुणे ते गोवा दोन दिवसांत पुणे ते पाचगणी ते पुणे, पुणे ते मुंबई ते पुणे मिलिंद सोमण यांच्याबरोबर एकाच दिवसात अशा अनेक मोहिमा त्यांनी याआधी केल्या आहेत. 
२ आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी एक तास त्या नवीन सायकलपटूंना मोफत प्रशिक्षण देतात. रोज शक्य नसले, तरी आठवड्यातून किमान एक दिवस तरी आॅफिसला सायकलने जाण्याचा सल्ला त्या सर्वांना देतात.

Web Title: she tourism of India by Cycle riding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.