‘ती’ खोलीत बोलवायची अन् लुटायची; डेटिंग ॲपद्वारे ओळख करून लुटणाऱ्या जोडप्याला बेड्या
By भाग्यश्री गिलडा | Published: October 30, 2023 09:06 PM2023-10-30T21:06:36+5:302023-10-30T21:08:10+5:30
यात एका २७ वर्षीय महिला आणि २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे...
पुणे : डेटिंग ॲपद्वारे पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला बोलावून लूटमार करणाऱ्या जोडप्याला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. यात एका २७ वर्षीय महिला आणि २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. अधिक माहितीनुसार, आरोपी महिला उत्तराखंड येथील आणि पुरुष दिल्लीचा आहे. डेटिंग ॲपद्वारे चॅटिंग करून गोड बोलून, मुलींचे फोटो पाठवून फसवणूक केल्याचे पुण्यात आतापर्यंत एकूण ६ गुन्हे घडले आहेत. हे दोघेही गेल्या दीड वर्षांपासून लुबाडण्याचा काम हे दोघेही करत होते.
सिकिंग एडवेंचर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून आरोपी महिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत ओळख करायची. त्यानंतर स्वतःचे फोटो टेलिग्रामवर पाठवत तुला भेटायचे आहे असे सांगायची. हॉटेलमध्ये रूम बुक करायला सांगून काही वेळ गप्पा मारायची. आरोपी पुरुष हॉटेलच्या बाहेरच थांबलेला असायचा. त्याला आतमध्ये बोलवून पुरुषाला मारहाण करत जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पडायचे. इतकेच नाही तर हे दोघे पीडिताला मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि पैसे काढून घ्यायचे.
अशा प्रकारच्या ३ तक्रारी आल्याने सामाजिक सुरक्षा विभाग आणि मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणातून यामध्ये एक महिला आणि पुरुष सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींवर पुण्यासह बंगलोर, हैदराबाद आणि मुंबई येथेही गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात लक्षात आले.
पुण्यामध्ये असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. कोणाच्याही बाबतीत असा प्रकार घडल्यास नागरिकांनी समोर यावे. घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तसेच कोणतेही डेटिंग अप्लिकेशन किंवा वेबसाईटचा वापर करताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
- भरत जाधव, पोलिस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग