ती प्रसुतिकरिता आली अन लिफ्टमध्ये अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 04:09 PM2018-10-16T16:09:11+5:302018-10-16T16:17:36+5:30
ससुन रुग्णालयाच्या क्रमांक तीनच्या लिफ्टमधे सोमवारी(दि.१६) मध्यरात्री तीन वाजता लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली.
पुणे - ससुन रुग्णालयाच्या क्रमांक तीनच्या लिफ्टमधे सोमवारी(दि.१६) मध्यरात्री तीन वाजता लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. दलाने नायडू अग्निशमन केंद्र व मुख्यालय येथून दोन वाहने तातडीने रवाना केली. अग्निशामक दलाचे जवान अवघ्या काही मिनिटातच ससुन रुग्णालयात पोहोचले. पण परिस्थिती गंभीर होती. लिफ्टमध्ये प्रसुतिकरिता शासकीय रुग्णवाहिकेतून आलेली महिला तसेच डॉक्टर व इतर चार असे एकूण सहाजण अडकल्याचे जवानांनी पाहिले. महिलेची अवस्था पाहून जवानांनी केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव काम सुरु केले.
घटनास्थळी लिफ्टमधे तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे दिड वाजण्याच्या सुमारास हे सहाजण अडकले होते. त्यामधे शासकीय रुग्णवाहिकेतून प्रसुतीकरिता तातडीचे म्हणून एका महिलेला प्रसुतिची वेळ असल्याने उपचाराकरिता आणले होते. परंतू, ती महिला व स्वत: रुग्णवाहिकेतील डॉक्टर व इतर चार या लिफ्टमधे तळमजला व पहिल्या मजल्याच्या मधोमध अडकून पडले. लिफ्टमधून मोबाईलवर कोणाशीही संपर्क होत नव्हता. सुमारे तासाभरानंतर अग्निशमन दलाला वर्दी दिली गेली. जवानांनी लिफ्टच्या डक्टमधे प्रवेश करुन व इतर जवानांनी लिफ्टच्या बाहेर खुर्ची ठेवून कौशल्याने तीस मिनिटातच गरोदर महिलेला अक्षरश: खांद्यावरुन बाहेर घेत इतर ही लोकांची सुखरुप सुटका केली. तेथील डॉक्टर्स, वॉर्ड बॉय व इतर लोकांनी टाळ्या वाजवून दलाच्या जवानांचे कौतुक केले.
या बचाव कामगिरीमधे नायडू अग्निशमन केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, तांडेल तानाजी मांजरे, चालक करिम पठाण, ज्ञानेश्वर भाटे व जवान जयेश गाताडे, विजय पिंजण, विष्णू जाधव, रवि जाधव, विनायक माळी, अक्षय दिक्षित यांनी सहभाग घेत एका गरोदर महिलेला व तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला मोठे जीवदानच दिले.