बॉयफ्रेंड मारुन टाकण्याची तिला वाटत होती भीती; पोलीस गेले धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:39 PM2020-04-27T21:39:27+5:302020-04-27T21:49:30+5:30
मुुळच्या मुंबईच्या या श्रीमंत तरुणीला तिचा बॉयफ्रेंड आपल्याला कधीही मारुन टाकेल, अशी भीती वाटू लागली.
पुणे : लॉकडाऊनमुळे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. सुरुवातीला अनेकांना बरे वाटले, पण आता महिन्याभरानंतर त्याचा त्रास वाटू लागला. त्यांच्यात भांडणेही होऊ लागली. तो तिला मारहाण करु लागला. त्यामुळे मुुळच्या मुंबईच्या या श्रीमंत तरुणीला तिचा बॉयफ्रेंड आपल्याला कधीही मारुन टाकेल, अशी भीती वाटू लागली. घाबरलेल्या या तरुणीने पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी तिची तात्पुरती पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय करुन तिला तिच्या आईवडिलांकडे जाण्याची परवानगी दिली.
याबाबत या तरुण महिलेने पोलिसांना सांगितले की, ती बॉयफ्रेंडबरोबर राहत होती. सध्या लॉकडाऊनमुळे आम्ही दोघेही घरात एकत्र असतो. आमचे सतत भांडण होत आहे. त्याने मला मारले सुद्धा आहे. त्यामुळे मला वाटते तो रागाच्या भरात मला मारुन पण टाकेल. मला खूप भीती वाटत आहे. माझे आई वडील मुंबईला असून मला त्यांच्याकडे जायचे आहे. तरी मला मुंबईला जाण्याची परवानगी द्यावी. या तरुणीच्या या विनंतीमुळे पोलिसांनी तातडीने तिच्याशी संपर्क साधला. तिच्या भावाशी संपर्क साधला. त्याने तिची तात्पुरती डब्ल्यु एस मेरियट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर तिला आईवडिलांकडे मुंबईला घरी जाण्यासाठी पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी प्रवासाचा पास उपलब्ध करुन दिला.