डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सुरु होती वाटचाल अन् रिंकू झाली स्टार अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:26 PM2023-01-01T15:26:26+5:302023-01-01T15:26:42+5:30

नागरिकांनी आपल्या पाल्यांची आवड तसेच कलागुण ओळखून त्यांना वाव देण्याची गरज

She was on her way to fulfill her dream of becoming a doctor and Rinku became a star actress | डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सुरु होती वाटचाल अन् रिंकू झाली स्टार अभिनेत्री

डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने सुरु होती वाटचाल अन् रिंकू झाली स्टार अभिनेत्री

googlenewsNext

राहुल गणगे

पुणे : आई-वडिलांना नृत्य आणि गायन या दोन्हींमध्ये रस आहे. यामुळे तिला घरातूनच अभिनय क्षेत्रातील मिळणारे धडे तसेच रिंकूला असलेला नृत्यातील रस यामधून तिला प्रेरणा मिळत गेली. यामधून डाॅक्टर बनणारी रिंकू आपले कलागुण पडद्यावर साकारत एक स्टार अभिनेत्री बनली. जर आम्ही डाॅक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत राहिलो असतो तर ती आज अभिनय क्षेत्रात कदाचित चमकलीच नसती. त्याप्रमाणे नागरिकांनी आपल्या पाल्यांची आवड तसेच कलागुण ओळखून त्यांना वाव देण्याची गरज आहे, असा संदेश सैराट फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची आई आशा व वडील महादेव राजगुरू यांनी दिला आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्या मुलांची जडणघडण कशी करावी, या विषयावर त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.

कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. प्रत्येक व्यक्तीची काही गुणवैशिष्ट्ये असतात. ही गुणवैशिष्ट्ये आपल्याला ओळखता आली पाहिजेत. एखाद्याला नृत्य आवडते. एखाद्याला चांगले पदार्थ तयार करून दुसऱ्याला खायला घालायला आवडते, तर एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. आपल्या पाल्यामधील ही गुणवैशिष्ट्ये काय आहेत, याचा शोध आपण घेतला पाहिजे. तसेच या गुणवैशिष्ट्याची जोपासना केली पाहिजे. जर पालकांनी किंवा पाल्याने आपल्या स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले तर अशक्य असे काहीच नाही. त्यामुळे आपल्या पाल्याची आवड ओळखून तिच्या कलाने आपण त्या गुणांना वाव दिला तरच त्या व्यक्तीचा जगावर ठसा उमटेल, अशी उत्तम जडणघडण होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रिंकू म्हणजेच आर्ची ही एक अष्टपैलू अभिनेत्री सर्वांनाच परिचित आहे. इतक्या लहान वयात ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. रिंकूला गोड गळा लाभला असून, ती गायनही करते. सुरुवातीला शाळेत जाण्याअगोदर रिंकू घरात कोणत्याही गाण्यावर बिनधास्त नृत्य करायची; परंतु अभिनय क्षेत्रात जाण्याचा कोणताही मानस सुरुवातीस नव्हता. तिचे डाॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी असलेल्या रिंकूचा चित्रपट किंवा चित्रपट जगताशी कोणताही संबंध नव्हता.

एकदा मराठी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे काही कामानिमित्त सोलापूर येथे आले होते. नागराज मंजुळेंसारख्या प्रसिद्ध व्यक्तीला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्यांमध्ये रिंकूही सहभागी झाली होती. त्यावेळी नागराज मंजुळे त्यांच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीसाठी ग्रामीण भागातील मुलीच्या शोधात होते. रिंकू राजगुरूला पाहून हीच मुलगी त्यांच्या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी योग्य आहे, असे वाटले. दरम्यान, रिंकूचे ऑडिशन घेण्यात आले आणि तिची ‘सैराट’ चित्रपटासाठी निवड झाली. रिंकू सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. वेस्टर्न आणि मॉडर्न ड्रेस घातलेली रिंकू तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. रिंकूचे आई-वडील उषा आणि महादेव हे दोघेही शिक्षक आहेत. तिच्या आई-वडिलांना नृत्य आणि गायन या दोन्हींमध्ये रस आहे. ते दोघेही यामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत आहेत. त्यामुळे रिंकूलाही लहानपणापासून या गोष्टींची आवड निर्माण झाली. रिंकू ही तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे, जी लाइमलाईटमध्ये आली आहे.

रिंकू सातवी इयत्तेत शिकत असताना तिने सैराट सिनेमासाठी ऑडिशन दिले; पण वर्षभरानंतर तिची सैराट सिनेमासाठी निवड झाली. आठवी इयत्तेत गेल्यानंतर तिने या सिनेमाचं शूटिंग सुरू केले. मात्र, सैराट सिनेमानंतर तिच्या आयुष्याला नवी भरारी मिळाली, यामधून स्टार अभिनेत्री झाली.

उदरनिर्वाहातून जोपासा कलागुण -

सध्या पुणे, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात अभिनय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात स्ट्रगल करणारी मुले आहेत. काही मुले घरदार सोडून गावापासून दूर राहतात. मिळेल ती नोकरी करून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडतात. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याने सुरुवातीला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, असे शिक्षण घेतले पाहिजे. त्यानंतर आपले कलागुण जोपासले पाहिजेत. तसेच घरातील व्यक्तींनी मुलांच्या आजूबाजूला वातावरण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे. तसेच अपेक्षांचे ओझे पाल्यांच्या मानगुटीवर न लादता त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे.

Web Title: She was on her way to fulfill her dream of becoming a doctor and Rinku became a star actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.