पुण्यात चाकूचा वार झेलत रणरागिणीने केला चाेरट्याचा सामना; सेंट्रल बिल्डिंगसमोरील थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:51 AM2022-06-13T11:51:19+5:302022-06-13T17:02:11+5:30
अन् नागरिकांच्या मदतीने चाेरट्याला पकडले...
पुणे : वेळ सायंकाळी ६ वाजण्याची. ऑफिस सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या सेंट्रल बिल्डिंगमधून बाहेर पडल्या हाेत्या. अचानक समोरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने चाकूने वारही केला. हा वार झेलत त्या रणरागिणीने चक्क त्या चाेरट्याचे मनसुबे उधळले. अन् नागरिकांच्या मदतीने चाेरट्याला पकडून पाेलिसांच्या हवाली केले.
सेंट्रल बिल्डिंगसमोरील हा थरार पाहायला मिळाला असून, प्रतीक्षा गोपाळ पाटील (म्हाडा कॉलनी, येरवडा) असे या जिगरबाज महिलेचे नाव आहे. त्यांच्या धैर्यामुळे रोहिदास साईदास चव्हाण (३५, रा. वडारवाडी) हा चोरटा पाेलिसांच्या हाती लागला आहे.
अधिक माहितीनुसार, प्रतीक्षा पाटील या कृषी आयुक्तालयात नोकरी करीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ऑफिस सुटल्यावर त्या घरी जात होत्या. सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूलाच असलेल्या बसस्टॉपवर त्या जात असताना अचानक समोरून चाेरटा रोहिदास चव्हाण याने त्यांच्या हातातील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रतीक्षा यांनी पर्स घट्ट पकडल्या हाेत्या. त्यावेळी चाेरट्याने त्यांच्या दिशेने चाकू फिरवला. ताे त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला लागल्यानंतरही त्या डगमगल्या नाहीत.
चाकू लागून जखमी झाल्याने हातातील जोर कमी पडला आणि चाेरट्याने हातातील पर्स हिसकावून पळ काढला हाेता. तशातही प्रतीक्षा यांनी धीर न सोडता चोर चोर म्हणून आरडाओरडा करत त्याचा पाठलाग करू लागल्या. त्यांचा आवाज ऐकून कपडे दुकानदार गोपाळ अतकरे व भास्कर जाधव यांनी चोरट्याचा पाठलाग केला. त्याच वेळी पोलीसही समोरून आले. दुकानदारांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पाेलिसांनी चाेरट्याकडील चाकू व महिलेची पर्स जप्त केली. तसेच प्रतीक्षा पाटील यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव अधिक तपास करीत आहेत.