‘ती’च्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार!

By admin | Published: March 8, 2017 04:58 AM2017-03-08T04:58:59+5:302017-03-08T04:58:59+5:30

खेड तालुक्यातील कारकुडीची उगलेवाडी... उभ्या डोंगरकड्यावर हजारो फूट उंचीवर दाट जंगलात वसलेली आदिवासी वाडी. या वस्तीला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने

'She' will be on the head! | ‘ती’च्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार!

‘ती’च्या डोक्यावरचा हंडा कधी उतरणार!

Next

- अयाज तांबोळी,  डेहणे
खेड तालुक्यातील कारकुडीची उगलेवाडी... उभ्या डोंगरकड्यावर हजारो फूट उंचीवर दाट जंगलात वसलेली आदिवासी वाडी. या वस्तीला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने, हंडाभर पाण्यासाठी दोन मैल जीवघेणी डोंगरकपारीतील खडतर पायपीट महिलांना करावी लागत आहे. ८० घरांचा उंबरा असलेली ३०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या वाडीत पाण्यासाठी ही परिस्थिती आहे, तर इतर सुविधांचा मागमूसही नाही.
‘पाणी म्हणजेच जीवन आहे’, याचा जीवघेणा प्रत्यय उगलेवाडीला गेल्याशिवाय कळत नाही. हंडाभर पाण्यासाठी दररोज मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्यच त्यांच्या नशिबी आले आहे. येथील महिलांना पहाटेपासूनच पाण्याच्या शोधार्थ पायपीट करावी लागत आहे. उगलेवाडीतील चालू असलेला रस्तासुद्धा ठेकेदाराने उखडून टाकला आहे. गेली दोन महिने काम बंद करून ठेकेदार गेला आहे. त्यामुळे डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालताना फार त्रास होतो. वस्तीपासून दोन मैल अंतरावर डोंगराच्या उताराने खाली दरीत उतरून पाझराचे पाणी आहे.
फुटलेल्या पाझराच्या थेंब थेंब पाण्याची साठवणूक करून, पाणी भरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हंडाभर पाण्याचे मोल किती आहे, हे त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. पाण्यासाठी डोळ्यांत तेल घालून त्यांना कडे उतरावे लागत आहे. पावसाळ्यात हाच रस्ता असल्याने अनेक वृद्ध महिला पाणी आणताना पडून कायमच्या जायबंदी झाल्या आहेत.

वस्तीला पाण्यासाठी पहाटे ४ वाजल्यापासून दिवस-रात्र २४ तास भटकंती करावी लागते. दोन हजार फूट डोंगर उतरून-चढून डोक्यावर हंडा घेऊन येणे फार त्रासदायक आहे. परंतु त्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने पाणी शोधत फिरण्यावाचून गत्यंतर नसते. पहाटे चार वाजता पाण्यासाठी गेल्यावर ७ वाजता एक हंडा पाणी घरी येते. दिवसाला दोन खेपाच मारण्याइतकी शक्ती शरीरात शिल्लक राहते.
अंधारात हातात रॉकेलचा पलिता घेऊन प्रकाशात अंधाराची पाऊलवाट तुडवत डोंगरातील कडेकपारी पार केल्या जातात. अति चढउतार असणाऱ्या डोंगरातील मुरमाड व दगडी पाऊलवाटेने रिकाम्या हातानेसुद्धा सहज चालता येत नाही. परंतु, अशा बिकट पाऊलवाटेवरून ३० ते ४० लिटर पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन चढावे लागते.
गॅस इथे शोधूनही सापडणार नाही. रानातील सुक्या सरपणावर साव्याची नाही तर नाचणीची भाकरी भाजून खाणारा हा आदिवासी तसाही समाधानी आहे. परंतु पाण्याच्या एका घागरीसाठी तो घरच्या लक्ष्मीला, लेकीला रानोमाळ फिरताना पाहून मात्र हतबल झाला आहे. उगलेवाडीकरांचीच ही व्यथा आहे असे नाही, तर डोंगरावर राहणाऱ्या वीस-बावीस गावांत हीच परिस्थिती आहे.

Web Title: 'She' will be on the head!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.