‘तिची’ अधिकारी होण्याची इच्छा होणार पूर्ण
By admin | Published: July 7, 2017 02:49 AM2017-07-07T02:49:31+5:302017-07-07T02:49:31+5:30
घरची परिस्थिती बेताची.. त्यातूनही आईने लोकांच्या घरी काम करून इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण दिले. मनात अधिकारी होण्याची इच्छा..
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : घरची परिस्थिती बेताची.. त्यातूनही आईने लोकांच्या घरी काम करून इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण दिले. मनात अधिकारी होण्याची इच्छा.. पण आर्थिक परिस्थिती आडवी येत असल्याने पुढे काय होणार हा प्रश्न.. मात्र इच्छा असेल तर मार्ग दिसतोच या उक्तीप्रमाणे पुढचे शिक्षण थांबवून नोकरीच्या शोधात असलेल्या बारामती शहरातील वसंतनगर येथील रुचीता गायकवाडला चांगलाच आधार मिळाला.
नोकरीसाठी मदत मागण्यासाठी गेलेल्या रुचीताची परिस्थिती समजल्यानंतर माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तिला तब्बल ७० हजारांची मदत केली. बारामती शहरातील वसंतनगर येथील वैशाली सुभाष गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्या लोकांच्या घरी स्वयंपाक व इतर कामे करतात.
अशा परिस्थितीतही आपल्या मुलीने मोठे व्हावे, कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे या जिद्दीतून वैशाली गायकवाड यांनी मुलीला इंजिनियरिंगपर्यंतचे शिक्षण दिले. इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा रुचिताचा मानस होता. परंतु त्यासाठीचा खर्च पेलवणारा नसल्याने शिक्षण थांबवून नोकरीच केलेली बरी या विचाराने रुचीताने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. योगेश जगताप यांनी रुचीताला नोकरीच्या मागे न लागता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला. नगराध्यक्ष पदाच्या काळात मिळालेले मानधन ५२ हजार रुपये आणि उर्वरीत १८ हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये रुचीताला देण्यात आले.
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्या हस्ते रुचीता व तिच्या आई वैशाली गायकवाड यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अमर धुमाळ, नगरसेवक पप्पू चव्हाण, बाळासाहेब जाधव, शारदा मोकाशी, अनिता जगताप, शीतल गायकवाड, अमजद बागवान, अल्ताफ सय्यद, बबलू जगताप, माणिक मोकाशी, अनिल जाधव, भूषण जगताप, सयाजी गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत चंद्रजीत धुमाळ, मेहुल दोशी, अली असगर बारामतीवाला, निलेश महाडिक आदींनी केले.