खून करना हिंसा है, खून देना अहिंसा है!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:09+5:302021-08-19T04:15:09+5:30
पुणे : ‘खून करना हिंसा है, खून देना अहिंसा है' हा विचार मनात ठेवून वेदना आणि उत्साहाच्या अनोख्या मिलाफामध्ये ...
पुणे : ‘खून करना हिंसा है, खून देना अहिंसा है' हा विचार मनात ठेवून वेदना आणि उत्साहाच्या अनोख्या मिलाफामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने आयोजित केलेले रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा ८ वा स्मृतिदिन २० आॅगस्टला आहे. कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनानिमित्त मनात उमेद घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केले होते. आचार्य आनंद ऋषी पुणे ब्लड बँक यांनी रक्तसंकलन केले. शिबिरासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने सहकार्य केले.
या शिबिराला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, नितीन पवार, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, माजी उपमहापौर नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक विशाल तांबे, ब्लड बँकेचे शांतीलाल सुरतवाला, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, सहायक राज्यकर आयुक्त भक्ती काळे, अभिनेते ओंकार गोवर्धन, बालअभिनेते साहिल जाधव, शाहीर शीतल साठे, सचिन माळी आदींनी उपस्थित राहून सदिच्छा दिल्या.
---
अजून किती जणांचे प्राण जाणार ? - बाबा आढाव
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे रस्त्यावर रक्त सांडले, पण आता कार्यकर्ते तरुणाई रक्तदान करत आहे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे, असे मत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. राजकारणात सर्रास अंधश्रद्धांचा वापर होतो. अंनिसचे काम अवघड आहे. आपली लढाई राजकारण टाळून लोकांना प्रबोधित करण्याचे आहे, यासाठी नरेंद्र दाभोलकर यांना प्राण गमवावे लागले आहे. अजून किती जणांचे प्राण जातील, सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.