जेजुरी डोंगरावर भाविकांसाठी विश्रांती शेड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 12:58 AM2019-01-06T00:58:49+5:302019-01-06T00:59:27+5:30
जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाकाठी येथे आठ मोठ्या यात्रा आणि दर रविवारी देवदर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात
जेजुरी : कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या कडेपठार मंदिराकडे जाणाऱ्या डोंगराच्या पायरी मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी जेजुरी शहर बाराबलुतेदार संघाच्या वतीने विश्रांती ओटे आणि शेड उभारण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे यांनी दिली.
जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षाकाठी येथे आठ मोठ्या यात्रा आणि दर रविवारी देवदर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. खंडोबा देवाचे मूळस्थान जुनागड कडेपठारावर आहे. जुने मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवर आहे. तसेच जेजुरीतील खंडोबा मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतर डोंगर चढून भाविकांना कडेपठार मंदिरात जावे लागते. हा कडेपठार डोंगर चढताना भाविकांची मोठी दमछाक होते. त्यामुळे बाराबलुतेदार संघाने या पायरीमार्गावर सहा ठिकाणी ओटे बांधण्यात आले आहेत. तर तीन ठिकाणी विश्रांतीओट्याबरोबरच शेड बांधण्यात आले आहेत. बाराबलुतेदार संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे, पदाधिकारी तुषार कुंभार, किरण राऊत, रामभाऊ जाधव, विजय दरेकर, रामदास राऊत, प्रसाद अत्रे, सुरेश दोडके, चिमाजी दोडके,अजिंक्य बारभाई, मंगेश झगडे, माणिक पवार, दिलीप गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला.
पाण्याची व्यवस्था करणार
कडेपठार डोंगर चढून जाताना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी कडेपठार देवसंस्थानकडे मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाण्याची पूर्तता न झाल्यास लोकसहभागातून पाण्याची टाकी बांधून प्रत्येक विश्रांती शेडजवळ नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय बाराबलुतेदार संघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सचिन खोमणे यांनी सांगितले.