कांद्याच्या पिकात सोडल्या शेळ्या-मेंढ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:55 AM2019-01-23T01:55:24+5:302019-01-23T01:55:30+5:30
नजीक पिंगोरी, आडाचीवाडी, बापसाई वस्ती, वरचामळा, पातरमळा, सुक्कलवाडी, पिसुर्टी, दौडज येथे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत.
वाल्हे : नजीक पिंगोरी, आडाचीवाडी, बापसाई वस्ती, वरचामळा, पातरमळा, सुक्कलवाडी, पिसुर्टी, दौडज येथे मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी असून गेले सहा महिने झाले कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारभाव नसल्यामुळे बापसाईवस्तीवरील शेतकरी दत्तात्रेय रावबा पवार व वरचामळा येथील हनुमंत बाबूराव भुजबळ यांनी आपल्या गरवी जातीच्या साधारण अनुक्रमे दहा व बारा पांड कांद्याच्या शेतात शेळ्या-बकºया सोडल्या आहेत.
सध्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नाही, त्यात राज्य शासनाचे तुटपुंजे अनुदान जाहीर केले आहे. कांदा अनुदानासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये मिळणार आहे ते अपुरे आहे.
>एकरी पंचेचाळीस हजार खर्च
कांदा लागवडीसाठी वावर तयार करणे, रोप तयार करणे, लागवड, दोनदा खुरपणी, औषध फवारणी, खत, काढणी, भरणी, पिशवीचा खर्च, वाहतूक खर्च, मार्केटचा खर्च हा सर्व खर्च पाहिला तर साधारण एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च लागतो, असे शेतकरी सदाशिव हरिभाऊ भुजबळ यांनी सांगितले.
त्यामुळे सध्या मिळणारा दर आणि उत्पादन खर्च याचा अजिबात मेळ बसत नाही आणि सरकारचे मिळणारे अनुदान हे बिलकूल परवडणारे नसल्यामुळे शेतकºयांच्यावर आपला कांदा शेळ्या-मेंढ्यांना चारायला द्यायची वेळ आली आहे.