राम कृष्ण हरी! श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण; देहूत नयनरम्य रंगला सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 10:33 PM2021-07-10T22:33:20+5:302021-07-10T22:33:39+5:30
पालखीला मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडल्याने वारीतील परंपरा जपल्याचे वारकऱ्यांना समाधान...
देहूगाव : श्री संत तुकाराम महारांजाच्या पालखीला देहूगाव येथील मंदिराच्या आवारात मेंढ्यांचे रिंगण घातले आणि वारीतील आपली परंपरा कायम ठेवली. यंदा श्री संत तुकाराम महाराजांची पायीवारीसाठी पालखी सोहळा कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाला. पायीवारी सोहळ्यास शासनाने मर्यादित वारकऱ्यांमध्ये हा सोहळा पार पाडण्यास परवानगी दिली. त्यानुसार 1 जुलैला 350 लोकांमध्ये पालखी प्रस्थान सोहळा पार पडला.
त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिरातील भजनी मंडपात ठेवून वारीतील नित्यनियमाचे कार्यक्रम व पूजा पाठ केले जात आहेत. पायीवारीत आज पालखी बारामती येथील मुक्कामानंतर काटेवाडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी थांबली असती. या ठिकाणी वारीतील परंपरेप्रमाणे धनगर समाजाच्या वतीने मेंढ्यांचे रिंगण घातले जात असते. त्यानुसार आज मंदिराच्या आवारात लालू सयाजी ढेकळे, दशरथ आनंदा ठेकळे, भिमराव पोपट ढेकळे व बाळु बबन शिंगटे हे देहूपरिसरात मेंढपाळ करणाऱ्या धनगरांनी आपल्या मेंढ्या मंदिरात पालखी प्रदक्षिणा घालण्यासाठी आणल्या होत्या.
परंपरेनुसार पालखीला मेंढ्यांचे रिंगण सोहळा पार पडल्याने वारीतील परंपरा जपल्याचे समाधान या सोहळ्यात सहभागी झालेल्य़ा वारकऱ्यांना झाले होते. प्रथमच या भागात मेंढ्या चारण्यासाठी चंदनापूरी येथून येत असतात. हे सर्व मेंढपाळ देहूपरिसरात राहून आपल्या मेंढ्या सांभाळतात. त्यांना प्रथमच असा प्रकारचा पालखीला मेंढ्यांचे रिंगण घालण्याचा सन्मान मिळाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसांडून वाहत होते. मंदिरात पहाटे काकडारती झाली. त्यानंतर नित्यनियमानुसार विठ्ठल रुख्मिणी मंदिर, शिळा मंदिर, पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराज समाधी व वैंकुठगमन मंदिरात महापूजा झाल्या. सकाळी भजनी मंडपात भजन झाले. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आल्या.
यावेळी या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घालुन वारीतील परंपरा कायम ठेवत रिंगण सोहळा पार पाडला. उद्या रविवार (ता. 10) रोजी बेलवडीचा प्रतिकात्मक गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे. यासाठी मंदिरातील नियमित वारकऱ्यांमध्येच हा सोहळा पार पडणार आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर मात्र बंदच असणार आहे.