दौंडच्या अपक्ष नगराध्यक्षा शीतल कटारिया राष्ट्रवादीत
By Admin | Published: December 30, 2016 04:28 AM2016-12-30T04:28:36+5:302016-12-30T04:28:36+5:30
दौंडच्या अपक्ष नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदार तथा माजी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
दौंड : दौंडच्या अपक्ष नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदार तथा माजी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. दौंडच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
शरद पवार हे अहमदनगर येथून बारामतीला निघाले होते. दरम्यान, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांचे निवासस्थान याच मार्गावर असल्याने दुपारी साडेचारच्या सुमारास ते कटारिया यांच्या निवासस्थानी आले. या ठिकाणी त्यांचा औपचारिक सत्कार झाला. या वेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया आणि सर्व सहकारी अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शीतल कटारिया यांच्यासह १0 अपक्ष नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना युतीच्या विरोधात निवडून आले होते. दरम्यान, नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीचे १४ सदस्य निवडून आले. दरम्यान, नगराध्यक्षपदी अपक्षांची सत्ता तर नगरसेवकपदी राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता आली. एकंदरीतच दौंडच्या जनतेने दोघांनाही अर्धी अर्धी सत्ता दिली. मात्र, नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नगर परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढणार आहे. शीतल कटारिया यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला, तरी १0 अपक्ष नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला की नाही, हे गुलदस्तातच आहे.
राष्ट्रवादीच्या म्यानात दोन तलवारी कशा?
सध्याच्या परिस्थितीत दौंड तालुक्यात राष्ट्रवादीची सूत्रे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्याकडे आहेत, तर दुसरीकडे निवडून आलेल्या नगराध्यक्षा शीतल कटारिया आणि सहकारी १0 नगरसेवक यांची सूत्रे प्रेमसुख कटारिया यांच्याकडे आहेत. थोरात आणि कटारिया यांचा राजकीय सवतासुभा सर्वश्रुत आहे.