मेंढपाळांवर आली भटकंतीची वेळ
By admin | Published: May 12, 2017 04:53 AM2017-05-12T04:53:10+5:302017-05-12T04:53:10+5:30
इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल होत असत. सहा महिने शेतकऱ्यांच्या जमिनीवर मेंढ्या बसवून ज्वारी, पैसे यांच्या मोबदल्यात शेतकरी मेंढपाळांना मिळत असे. मात्र, आंतरपिके घेण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. मेंढपाळांना जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे मेंढपाळांना हजारो मेंढ्या जगवण्यासाठी रस्त्याच्या कडेनेच भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. ना चारा, ना पाणी. मेंढ्या बसवण्यासाठी शिल्लक जमिनी उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच आपली पाले ठोकून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.मेंढपाळ दत्तू रामा ठोंबरे याच्याकडे ६०० मेंढ्या उपलब्ध आहेत. त्यांना घेऊन कुटुंबासह ३ महिन्यांपासून ते बाहेर पडलेले आहेत. तीन महिन्यांत तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने आपल्या शेतात मेंढ्या बसवल्या नाहीत. त्यामुळे दोन-दोन मेंढ्या विकून आपले कुटुंब जगवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर, या मेंढ्यांना जगवण्यासाठी तालुक्यात कुठेही जमिनीवर चारा उपलब्ध नाही.
दत्तू ठोंबरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना स्वत:ची शेती असताना त्याच्या जनावरांच्या चारापाण्याची सुविधा म्हणून चारा छावण्या उभरल्या जातात. ज्या मेंढपाळांना गुंठाभर जमिनी नसतात, त्यांना मात्र चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. शासनाच्या कोणत्याही सुविधा या मेंढपाळांना मिळत नाहीत. भटकंती करणारा हा समाज स्थिर होण्यापासून वंचित राहिला आहे. शासनाने अशा भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना चारा छावण्यांत समाविष्ट करून घ्यावे, अशी अपेक्षा या मेंढपाळांची आहे.