शिध्याचा ‘आनंद’ महिनाभरात केवळ ८४ टक्के जनतेलाच; राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक
By नितीन चौधरी | Published: April 25, 2023 04:22 PM2023-04-25T16:22:36+5:302023-04-25T16:22:51+5:30
गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात
पुणे : गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात आला. हा शिधा महिनाभरात वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, राज्यात आतापर्यंत या शिध्याचे ८४ टक्केच वाटप करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्याने राज्यात शिधा वाटपात आघाडी घेतली असून येथे ९५ टक्के शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले आहे. तर रायगड जिल्ह्यात केवळ ६० टक्केच वाटप होऊ शकले आहे. पुणे जिल्ह्यात ९० टक्के तर पुणे शहरात ८२ टक्के वाटप झाले आहे.
हा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल वाटप करण्यात आले. हा आनंदाचा शिधा गुढीपाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी वाटप करण्यात येणार होता. राज्यात १ कोटी ५९ लाख २५ हजार ४७९ शिधापत्रिकाधारक असून आतापर्यंत १ कोटी ३४ लाख २३ हजार १२६ शिधापत्रिकाधारकांनी या शिध्याचा लाभ घेतला आहे. याचे प्रमाण ८४ टक्के आहे. राज्यात भडारा जिल्ह्याने हा शिधा वाटप करण्यात आघाडी घेतली आहे. येथील २ लाख २८ हजार ७८१ लाभार्थ्यांपैकी २ लाख १८ हजार ३३७ लाभार्थ्यांना अर्थात ९५ टक्के शिधावाटप करण्यात आले आहे. तर त्याखालोखाल गोंदिया व नागपूर जिल्ह्यात ९४ टक्के तर सांगली जिल्ह्यात ९३ टक्के वाटप करण्यात आले आहे. सर्वात कमी वाटप रायगड जिल्ह्यात ६० टक्केच झाले आहे.
पुणे जिल्हा नवव्या तर शहर ३२ व्या क्रमांकावर
पुणे जिल्ह्याचा क्रमांक राज्यात नववा आहे. जिल्ह्यात ५ लाख ६१ हजार ५९२ लाभार्थ्यांपैकी ५ लाख २ हजार ८७८ जणांनी याचा लाभ घेतला आहे. पुरंदर, भोर, वेल्हा व आंबेगाव या तालुक्यांत एकूण लाभार्थ्यांपैकी ९३ टक्के लाभार्थ्यांना याचे वाटप करण्यात आले आहे. तर जुन्नर व खेड तालुक्यांत ९१ टक्के वाटप करण्यात आले आहे. दौंड, हवेलीत ८९, बारामती ८८, इंदापूर शिरूरमध्ये ८७ मुळशीमध्ये ८५ व सर्वात कमी ८५ टक्के वाटप मावळ तालुक्यात झाले आहे. पुणे शहरात ३ लाख १७ हजार ८८१ लाभार्थी आहेत. त्यापैकी २ लाख ६० हजार ५०३ जणांनी (८२ टक्के) या शिध्याचा लाभ घेतला आहे.
आनंदाचा शिधा जिल्हानिहाय वाटप (टक्क्यांत)
भंडारा ९५, गोंदिया ९४, नागपूर ९४, सांगली ९३, अंधेरी ९१, चंद्रपूर ९०, वर्धा ९०, परभणी ९०, पुणे ९०, संभाजीनगर ८९, सोलापूर ८८, लातूर ८७, कांदिवली ८७, गडचिरोली ८७, धुळे ८७, बुलढाणा ८७, नागपूर शहर ८६, अमरावती ८६, परळ ८६, यवतमाळ ८६, कोल्हापूर ८५, जळगाव ८५, नगर ८५, जालना ८५, धाराशिव ८५, वाशिम ८४, ठाणे शहर ८४, पालघर ८३, नंदूरबार ८२, पुणे शहर ८२, नांदेड ८२, ठाणे ८१, वडाळा ७९, हिंगोली ७६, बीड ७६, अकोला ७६, सातारा ७३, सिंधुदुर्ग ६८, रत्नागिरी ६३, रायगड ६०