शिवाजीनगर एसटी स्थानकाचे तीन महिन्यांनंतर स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 04:30 PM2019-01-03T16:30:51+5:302019-01-03T16:31:08+5:30
शिवाजीनगर एस.टी. स्थानक वाकडेवाडी येथील दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर स्थलांतरीत होणार आहे.
पुणे: पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी शिवाजीनगर येथील एस.टी.स्थानकाची जागा तीन वर्षे भाडे करारावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शिवाजीनगर एस.टी. स्थानक वाकडेवाडी येथील दुग्धव्यवसाय विभागाच्या जागेवर स्थलांतरीत होणार आहे.मात्र,आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतरच एस.टी.स्थानकाचे स्थलांतर केले जाईल,त्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल,असे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
राज्याच्या कृषी ,पशूसंवर्धन,दुग्धविकास व मत्सव्यवसाय विभागाच्या वतीने शिवाजीनगर एस.टी.स्थानक स्थलांतरित करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला आहे.मात्र,काही अटी व शर्तीच्या अधिन राहून दुग्धविकास विभागाने ही जागा भाडेकरारावर देण्याचे मान्य केले आहे.त्यानुसार या जागेचे इतर कोणासही हस्तांतरण,फेरवाटप करता येणार नाही.तसेच या जमिनीवर अथवा जमिनीच्या कोणत्याही भागावर व्यक्ती किंवा संस्था,कंपनीला कोणत्याही भागावर हक्क निर्माण होतील,अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही.तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ मागणीची आवश्यकता भासणार नाही या करिता महाराष्ट्र मेट्रो रेले कॉर्पोरेशन लि.पुणे यांनी त्यांची कामे त्वरीत सुरू करावीत.तसेच जागेवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी.
शिवाजीनगर एसटी स्थानकासाठी केवळ दुग्धव्यवसाय विभागाची जागा पुरेसी नाही.त्यामुळे एसटी महामंडळाने वाकडेवाडी येथील अतिरिक्त जागेचेही मागणी केली आहे.अद्याप स्थानकासाठी आवश्यक असलेली सुमारे 8 एकर जागा महामंडळाच्या ताब्यात मिळालेल्या नाहीत.मेट्रो प्रशासनाकडून एस.टी.महामंडळाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच एस.टी.स्थानकाचे स्थलांतर केले जाणार आहे.त्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो,असे एसटी महामंडळाचे विभागीय अधिकारी एस.डी.भोकरे यांनी सांगितले.