शिवाजीनगर स्थानकाचे स्थलांतर, मेट्रो भुयारी मार्गाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:30 AM2018-10-27T01:30:52+5:302018-10-27T01:30:55+5:30
मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
पुणे : मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ ते मुळा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर (वळू पैदास केंद्राजवळ) जाणार आहे. जानेवारी २०१९मध्ये या कामाला सुरुवात होईल.
मेट्रोच्या भुयारी मार्ग प्रकल्पाचे प्रमुख अभियंता प्रमोद आहुजा यांनी ही माहिती दिली. ५ किलोमीटरच्या या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या बरोबर खाली मेट्रोचे स्थानक असेल.
आहुजा म्हणाले, ‘‘हा मार्ग ५ किलोमीटरचा आहे. त्यात ५ भुयारी स्थानके असतील. शिवाजीनगरपासून काही किलोमीटर अलीकडे रेंजहिल येथे मेट्रोचा भुयारात प्रवेश होईल. तिथे एक स्थानक असेल. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आताच्या जागेवर भुयारी मार्गातील दुसरे, त्यापुढे फडके हौद (कसबा पेठ), मंडई (जुनी मिनर्व्हा टॉकीजजवळ) व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके असतील.
फडके हौद व अन्य काही स्थानकांच्या इथे खासगी जागा संपादन कराव्या लागणार आहेत. फडके हौदाजवळ मात्र काही कुटुंबे यात बाधित होणार आहेत. त्यांना जागा देण्यात येईल. जागामालकांनाही नुकसानभरपाई देण्यात येईल.
>मेट्रो करणार खर्च
आहुजा म्हणाले, ‘‘भुयारी काम क्लिष्ट आहे. त्यामुळे किमान २ वर्षे तरी शिवाजीनगर एसटी स्थानक बाहेरच असेल. भुयारी स्थानकाचे काम झाल्यावर मात्र पुन्हा पूर्वीच्याच जागी एसटी स्थानक बांधण्यात येईल. हा सर्व खर्च मेट्रो करणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाची संमती मिळाली आहे.