विद्यापीठ स्थायी समितीचे राजकारण शिगेला
By admin | Published: April 14, 2015 01:36 AM2015-04-14T01:36:53+5:302015-04-14T01:36:53+5:30
विद्यापीठातील स्थायी समितीमधील दोन गटांमधील राजकारण चांगलेच तापले असून, आमच्याच गटातील उमेदवाराची नियुक्ती व्यवस्थापन परिषदेवर करावी; अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलन केले जाईल,
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याच्या नियुक्तीसाठी विद्यापीठातील स्थायी समितीमधील दोन गटांमधील राजकारण चांगलेच तापले असून, आमच्याच गटातील उमेदवाराची नियुक्ती व्यवस्थापन परिषदेवर करावी; अन्यथा पुढील आठवड्यात आंदोलन केले जाईल, अशी भूमिका विद्यापीठाच्या अधिकार मंडळातील काही ज्येष्ठ सदस्यांनी सोमवारी घेतली आहे. तसेच याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी चर्चा केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी गेल्या आठवड्यात समितीची बैठक अचानकपणे रद्द केली. परंतु, नियोजित बैठक रद्द करता येणार
नाही. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या सदस्यांनी संताप व्यक्त केला.
तसेच, उपस्थित सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक घेऊन अहमदनगर येथील दोन व्यक्तींची व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेवर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. आता हाच निर्णय कायम ठेवावा, अशी भूमिका स्थायी समितीतील सुमारे आठ ते नऊ सदस्यांनी घेतली आहे.
त्याचप्रमाणे येत्या १५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची नियोजित बैठकही रद्द करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ अधिसभा सदस्य डॉ. गजानन एकबोटे, राजेंद्र विखे पाटील, अशोक सावंत, शर्मिला चौधरी, अशोक चासकर आदींनी सोमवारी कुलगुरू डॉ. गाडे यांच्याशी याबाबत चर्चा केली.
नाशिक येथील एका प्राचार्यांची नियुक्ती व्यवस्थापन परिषदेवर करावी, अशी स्थायी समितीमध्ये कमी संख्याबळ असलेल्या गटाची मागणी आहे. तर नाशिक येथील एका महिला प्राचार्यांची नियुक्ती या पदावर करावी, असी आठपेक्षा जास्त संख्याबळ असलेल्या गटाची मागणी आहे.
परंतु, ऐन वेळी संख्याबळ
कमी होऊ नये म्हणून
अध्यक्षांच्या अनुपस्थितीत केलेल्या व्यक्तींच्या नियुक्तीला मंजुरी द्यावी, अशी भूमिका विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांनी घेतली आहे.
स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र विखे पाटील म्हणाले, स्थायी समितीच्या अध्यक्षांनी अचानकपणे मनमानी पद्धतीने समितीची बैठक
रद्द केली. परंतु, उपस्थित सदस्यांनी बैठक घेऊन ज्या व्यक्तींची
निवड व्यवस्थापन परिषदेवर केली. त्यास विद्यापीठाने मान्यता द्यावी,
अशी मागणी समितीच्या सदस्यांनी सोमवारी कुलगुरूंकडे केली.
तसेच, नियुक्तीस मान्यता
दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
स्थायी समितीच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या अनुपस्थितीत बैठक घेऊन दोन व्यक्तींची नियुक्ती विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर केली आहे. परंतु, या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून मगच या नियुक्त्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ