मंगलदास बांदल यांना फसवणुकीच्या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:40 PM2021-05-26T21:40:28+5:302021-05-26T21:41:17+5:30
मंगलदास बांदल यांनी फिर्यादी यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले....
शिक्रापूर: शिरूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी बनावट खरेदी खताच्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून सव्वा कोटींचे कर्ज घेतले. व त्याची परतफेड न करत एका नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूरपोलिसांनी बुधवारी ( दि. २६) अटक केली आहे. याबाबत दत्तात्रय मांढरे यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांनी फिर्यादी मांढरे यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले.मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदी खत करून बांदल यांनी त्या आधारे शिवाजीराव भोसले बँकेतून आठ लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतः वापरले. व पुन्हा सदर मिळकती वर कर्जाकरिता मांढरे यांच्या कुलमुकात्यारपत्र व बोगस पुरवणी दस्त करून शिवाजीराव भोसले बँकेतून सव्वा कोटी रुपये कर्ज घेत तेही स्वतः साठी वापरले .व त्याचे कर्ज हप्ते अडीच कोटी रुपयापर्यंत गेले आहे. या प्रकरणी फसवणूक झाली म्हणून मांढरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे करत आहेत.
मंगलदास बांदल यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच जमीन बळकावल्याचा गुन्हा दाखल
एका सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन बळकावण्यासाठी त्रास देत व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकारी मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगलदास बांदल आणि बापूसाहेब बांदल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.