शिक्रापूर पोलिसांचा सणसवाडीत गुटखा अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:00+5:302021-08-26T04:14:00+5:30
तब्बल वीस लाख साठ हजार रुपयांचा गुटखा जप्त कोरेगाव भीमा : शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध ...
तब्बल वीस लाख साठ हजार रुपयांचा गुटखा जप्त
कोरेगाव भीमा : शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांवर शिक्रापूर पोलिसांचे छापे सुरू असताना, आता शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने तब्बल वीस लाख साठ हजार रुपये किमतीच्या गुटख्यावर छापा टाकत कल्लू गुप्ता या इसमावर गुन्हे दाखल केले आहेत.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील नरेश्वर मंदिराच्या पाठीमागे एका इसमाने त्याच्या खोलीत मोठ्या प्रमाणात गुटख्याची साठवणूक केली असून, त्यातून तंबाखूमिश्रित पदार्थ बनवून नागरिकांना विक्री केले जात असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने सणसवाडी येथील नरेश्वर मंदिराच्या पाठीमागे सदर इसमाच्या घरामध्ये जात पाहणी केली. तेथे वेगवेगळ्या कंपनीच्या नावे असलेला वेगवेगळा असा तीन लाख सोळा हजार आठशे रुपये किमतीचा आरएमडी पान मसाला, एक लाख वीस हजार किमतीची आरएमडी तंबाखू, सहा लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी, किमतीचा विमल पानमसाला कंपनीच्या एकूण २२ खाकी गोण्या, पाच लाख पन्नास हजार आठशे किमतीचा राजश्री पान मसाला कंपनीच्या एकूण १०२ पिशव्या, पन्नास हजार चारशे किमतीचा ब्लॅक लेेेबल एकूण ७ पोती, तीन लाख अंदाजे किमतीची राज पान मसाला कंपनीची एकुण १० पोती, ८०००/- रू. अंदाजे किमतीचा आरजे १००० तंबाखू कंपनीची दोन गाेणी, बावीस हजार किमतीची व्ही -१ कंपनीची तंबाखू, बावन्न हजार आठशे किमतीची व्ही -१ तंबाखू कंपनीची १६०० पाकिटे असा वीस लाख साठ हजार रुपयांचा गुटखा तसेच पानमसाला मिळून आला. या वेळी पोलिसांच्या पथकाने तेथील सर्व गुटखा साठा जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक शिवाजी युवराज चितारे (रा. शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी कल्लू गुप्ता (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) याचे विरुध्द गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहेत.