शिक्रापूरच्या महिला तलाठ्याला जातीवाचक शिवीगाळ; माजी उपसरपंचाविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 03:38 PM2023-05-23T15:38:55+5:302023-05-23T15:40:25+5:30
तुम्ही नोंदणी का करत नाही असे म्हणून महिला तलाठी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला...
शिक्रापूर (पुणे) : येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी तलाठी कार्यालयात जाऊन महिला तलाठी यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करीत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिक्रापूरपोलिस स्टेशन येथे माजी उपसरपंच रमेश राघोबा थोरात यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील तलाठी सुशिला गायकवाड या कार्यालयात कामकाज करीत असताना माजी उपसरपंच रमेश थोरात कार्यालयात आले, त्यांनी तलाठी गायकवाड यांना माझ्या प्लॉटिंगच्या व्यवसायातील काही दस्त मी तुम्हाला नोंदणीसाठी दिलेले बरेच दिवस झाले, तरी तुम्ही नोंदणी का करत नाही असे म्हणून महिला तलाठी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यांनतर गायकवाड यांना जातीवाचक बोलून तलाठी कार्यालयातील कागदपत्रे फेकून देऊन रागाने बोलून दरवाजात जाऊन शिवीगाळ, दमदाटी करुन यांची बदलीच करतो असे म्हणून निघून गेले.
घडलेल्या प्रकाराबाबत शिक्रापूरच्या तलाठी सुशीला शंकर गायकवाड (वय ४१, रा. विकास सदन, खंडोबा मंदिर जवळ वडगाव मावळ ता. मावळ) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य रमेश राघोबा थोरात (रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी व पोलिस हवालदार चंद्रकांत काळे करीत आहेत.