Pune Crime: शिंदे टोळीतील प्रमुखाला पिस्तुलासह बेड्या; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:44 PM2024-03-22T12:44:45+5:302024-03-22T12:45:09+5:30
मोक्काच्या गुन्ह्यात फरार झालेल्या शिंदे टोळी म्होरक्याला बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत...
पुणे : जुन्या भांडणावरून तरुणावर धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. त्या गुन्ह्यात मोक्काच्या गुन्ह्यात फरार झालेल्या शिंदे टोळी म्होरक्याला बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. सौरभ शरद शिंदे (२३, रा. पूनम गार्डनच्या मागे, बिबवेवाडी) असे अटक आराेपीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, प्रेम ऊर्फ यश कदम हा ८ नोव्हेंबर २०२३ रोजी बाहेरून जेवण करून घरी येत असताना त्याच्या ओळखीचे आरोपी सौरभ शिंदे, तेजस जगताप, चंदर राठोड, अनिकेत काटकर, पंकज दिवेकर यांनी त्याला धरून अप्पर बिबवेवाडी येथील मोकळ्या मैदानात नेत पूर्व वैमनस्यातून लोखंडी हत्यार, रॉडने त्याच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होऊन नंतर मोक्काची कारवाई झाली आहे. मात्र या गुन्ह्यातील म्होरक्या सौरभ शिंदे हा फरार झाला होता. त्याचा बिबवेवाडी पोलिस शोध घेत होते.
शोध घेत असताना पथकातील अंमलदार शिवाजी येवले यांना आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलिस हवालदार बाळू शिरसट, श्यामराव लोहोमकर, संतोष जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.