Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक

By राजू इनामदार | Published: July 12, 2022 07:36 PM2022-07-12T19:36:17+5:302022-07-12T19:36:35+5:30

बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातूनही शिवसेनेच्या विटा ढासळू लागल्या

Shinde sena will also contest municipal elections in Pune | Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक

Pune Municipal Corporation: पुण्यात शिंदेसेनाही लढणार महापालिका निवडणूक

googlenewsNext

पुणे : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० जणांना पुण्यात सुरुवातीला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यातूनही शिवसेनेच्या विटा ढासळू लागल्या आहेत. वाढता प्रतिसाद विचारात घेऊन शिंदेसेनाही महापालिका निवडणुकीत उतरणार, हे नक्की झाले आहे. ते भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून काही जागा लढवण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने राज्यात राजकीय बंडाळी हाेताना पुणे शहर व जिल्हा एकदम शांत होता. काही दिवसांनी कट्टर शिवसैनिकांनी बंडखोरांचा धिक्कार करत आंदोलनही केले. बंडखाेर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. त्याची सुरुवात शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. ते उघडपणे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला हजर राहिले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे काय चुकले याचाही पाढा जाहीरपणे वाचला. त्यानंतर पुण्यातील चलबिचल वाढली.

हडपसरमधील माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री शिंदे यांचे हडपसरमध्ये जाहीर स्वागत केले. यावेळी माजी शहरप्रमुख अजय भोसले, युवा सेनेचे प्रदेश सहसचिव किरण साळी यांनी शिंदे गटाबरोबर असल्याचे जाहीर केले. यातील साळी हे शिंदे गटाला मिळालेले माजी मंत्री उदय सामंत यांचे समर्थक आहेत. भानगिरे यांच्याबरोबर आणखी काही माजी नगरसेवक शिंदेगटाला जाऊन मिळण्याची चर्चा आहे. त्यावरून आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेगट उतरणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अडवणूक हाेत असल्याचे कारण देत शिंदे गटाने बंडखाेरी केली हाेती. त्यानंतर भाजप बराेबर जात सरकार स्थापन केले आहे. तीच युती पुण्यात देखील होऊ शकते. विसर्जित महापालिकेत भाजपची सत्ता होती. आताही आम्हीच सत्तेवर येणार, असा दावा ते करत आहेत. त्यांच्याबरोबर युती जाहीर करून शिंदे गट त्यांच्याकडून काही जागा मिळवून घेतील, असा अंदाज आहे. त्यातही उपनगरांमध्ये राजकीय वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपला सक्षम उमेदवार हवे आहेत. तसे मिळाले तर ते तिथे शिंदे गटाला जागा देऊ शकतात. तसे झाल्यास शिंदे गटाला शिवसेनेतून आणखी काही जण मिळतील. त्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू आहे.

Web Title: Shinde sena will also contest municipal elections in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.