जितेंद्र आव्हाडांसोबत काम करण्यास काँग्रेसच्या शिंदेंचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:50 AM2019-03-31T06:50:20+5:302019-03-31T06:50:58+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादीत बेबनाव । पूर्णेकर गटाच्या पाठिंब्यानंतर केला विरोध
अजित मांडके
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना विरोध करत काँग्रेसमधील शहराध्यक्ष मनोज शिंदे गटाने नाराजीचे निशाण फडकावले आहे. ‘आम्ही आमचा निर्णय पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतरच घेऊ’, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने आम्हाला वारंवार डावलले आहे, त्यामुळे आता आमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या त्यांनी मान्य केल्या, तरच समन्वय समितीच्या बैठकीला हजर राहू, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे.
राज्यपातळीवर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवरून ठिणगी पडली आहे. ठाण्यातही तशीच ठिणगी पडली असून ठाणे शहर काँग्रेसमधील ब्लॉक अध्यक्षांनी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील, त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेत थेट प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवले होते. त्यामुळे अलीकडेच काँग्रेसमधील पूर्णेकर गटाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेसमधील दोन गटांचा वाद पुन्हा उफाळल्याचे दिसून आले. परंतु, यावर राष्टÑवादीने पुढाकार घेत, तोडगा काढण्याचा निर्णय घेत, काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नाराज झालेले काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते हुसेन दलवाई हेसुद्धा हजर होते. या बैठकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये दिलजमाई झाली, असे स्पष्ट करण्यात आले. परंतु, त्यावेळी शिंदे यांची भूमिका अस्पष्ट होती.
‘दिलजमाई’ होणार?
ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेबरोबरील मनोमिलनाचा डाव अवघ्या काही दिवसांत मोडल्याने आता काँग्रेसच्या एका गटाने राष्टÑवादीच्या विरोधात ताठर भूमिका घेतली आहे. येत्या सोमवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठाण्यात बोलावण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशपातळीवरील नेते राजेश शर्मा आणि हुसेन दलवाई हजर राहणार असून, त्यांच्यासमवेत प्रदेशचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. या बैठकीत आम्ही राष्टÑवादीच्या विरोधातील आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. आम्ही राष्टÑवादीच्या विरोधात नाहीत. श्रेष्ठींचा निर्णय आम्ही मान्य करू, मात्र आमच्या काही मागण्या आहेत, त्या मान्य झाल्यास आम्ही २ एप्रिल रोजी होणाºया आघाडीच्या समन्वयाच्या बैठकीला हजर राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आमच्या मागण्या मान्य करा’
दरम्यान मुंब्रा, दिवा भागांत राष्टÑवादीने काँग्रेसला बुथ लेव्हलचे काम करण्याची परवानगी द्यावी. मागील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्टÑवादीने अनेक आश्वासने दिली होती, ती पाळलेली नाहीत. ती त्यांनी पाळावीत. निवडणुकीच्या वेळेस आम्ही साथ देत असलो, तरी प्रचाराच्या बॅनर, पोस्टरवर आमचा उल्लेख टाळला जातो. नावांचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात यावा. ठाण्यातील प्रचाराचे केंद्र हे काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालय असावे, या व इतर काही मागण्या पक्षश्रेष्ठींकडे मांडल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून त्या मागण्या मान्य झाल्या, तरच आम्ही राष्टÑवादीचे काम करू, असा इशारा या नाराजांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला पक्षश्रेष्ठी उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा मान ठेवण्यात आला होता. परंतु, आजही राष्टÑवादीकडून आम्हाला डावलले जात आहे. त्यामुळे आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मान्य झाल्या तरच आम्ही काम करू, अन्यथा आम्ही राष्टÑवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही.
-मनोज शिंदे,
अध्यक्ष,
ठाणे शहर काँग्रेस.