शिंदोडीत शेतकऱ्यांचे उपोषण
By admin | Published: March 27, 2017 02:15 AM2017-03-27T02:15:24+5:302017-03-27T02:15:24+5:30
शिंदोडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांनी आज कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले
निमोणे : शिंदोडी (ता. शिरूर) येथील शेतकऱ्यांनी आज कर्जमुक्तीसह विविध प्रश्नांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
शिंदोडी येथे आज (दि. २६) शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांसाठी लाक्षणिक उपोषण केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळून त्यांचा सातबारा कोरा व्हावा, कांद्यासह इतर सर्व शेतमालात योग्य बाजारभाव मिळावा, बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी या कारणांसाठी ग्रामदैवत श्रीविठ्ठल मंदिरामध्ये हे उपोषण झाले. वारंवार पडत असलेले दुष्काळ, कांद्यासह शेतमालास मिळणारा कवडीमोल बाजारभाव, मजुरीचे वाढलेले दर, खते आणि औषधांच्या वाढलेल्या किमती, जमिनीची कमी होत चाललेली उत्पादनक्षमता, शेतीभांडवल, नैसर्गिक आपत्ती इत्यादी विविध कारणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे. नव्या हंगामासाठी त्याच्याकडे भांडवल शिल्लक नाही. शिवाय बँका आणि पतपेढ्या यांचा तगादा चालू आहे. यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणे आवश्यक आहे तरच शेतकरी जगू शकतो. शासन उद्योगपतींना करोडो रुपयांची सूट देते, मात्र शेतकऱ्यांना योग्य वेळची वाट पाहायला लावत आहे. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरीवर्ग प्रचंड आक्रमक झाला आहे. त्याचाच भाग म्हणून आज शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी आज ग्रामदैवत श्री विठ्ठलाच्या मंदिरात लाक्षणिक उपोषण केले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून या विभागाचे मंडलाधिकारी डी. एस. पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. योगेश ओव्हाळ, भगवंत वाळुंज, प्रकाश शिंदे, रामकृष्ण गायकवाड, कृष्णकुमार माने, भरत थोरात, विशाल फलके आदींनी या उपोषणात सहभाग घेतला.(वार्ताहर)