शिरूर रुग्णालयाचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:21 AM2018-05-03T06:21:22+5:302018-05-03T06:21:22+5:30

ग्रामीण रुग्णालयाची तीन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत वैद्यकीय निकषाप्रमाणे नसून कॅज्युएल्टी रूम बांधण्यात आली नाही.

Shinoor Hospital's Panchnama | शिरूर रुग्णालयाचा पंचनामा

शिरूर रुग्णालयाचा पंचनामा

Next

शिरूर : ग्रामीण रुग्णालयाची तीन वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत वैद्यकीय निकषाप्रमाणे नसून कॅज्युएल्टी रूम बांधण्यात आली नाही. ज्या खोल्या बांधल्या त्या अरुंद असल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे खुद्द ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकासह डॉक्टर्स व इतर टेक्निशियनन्से जिल्हा शल्यचिकित्सालय विभागाच्या आरएमओसमोर मान्य केले. यावर स्थानिक स्तरावरील समस्या त्वरित सोडवल्या जातील व वरिष्ठ स्तरावरील समस्या त्या स्तरावर पंधरा दिवसांत सोडवण्याचे आश्वासन आरएमओ डॉ. एस. एल. जगदाळे यांनी सांगितले.
ग्रामीण रुग्णालयातील असुविधा व अनागोंदी कारभाराबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक विभागाने आरएमओ जगदाळे यांना ग्रामीण रुग्णालयातील असुविधांचा आढावा घेण्यासाठी येथे धाडले. पाचंगे यांना चर्चेसाठी पाचारण केले. या चर्चेत पाचंगे यांनी चर्चेला उपस्थित आरएमओ जगदाळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रोकडे व इतर डॉक्टर्स, तसेच टेक्निशियन्सची अक्षरश: खरडपट्टीच काढली. पाचंगे यांच्या प्रश्नांसमोर सर्वच जण निरुत्तर झाले. ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेवेबाबतएकूणच प्रचंड अनास्था या चर्चेतून समोर आली.
या चर्चेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो एवढ्या मोठ्या इमारतीत कॅज्युएल्टी (अपघात विभाग) साठी रूमच बांधण्यात आली नाही. गेली तीन वर्षे यामुळे जिन्याखाली हा विभाग थाटण्यात आला होता. याबाबत मात्र ग्रामीण रुग्णालयाने तीन वर्षांत काहीच हालचाल केली नाही. यामुळे बैठकीत या प्रश्नावर डॉक्टर्स निरुत्तर झाले. तात्पुरते दुसऱ्या एका खोलीत हा विभाग शिफ्ट करतो, असे मोघम उत्तर या वेळी देण्यात आले.
वैद्यकीय कचरा नष्ट करण्यासाठी शासनाने या रुग्णालयाला २२ लाख रुपयांचे मशिन दिले आहे. मात्र खोली उपलब्ध नसल्याने मशिनचा वापर केला जात नसल्याचे डॉ. रोकडे यांनी सांगितले. सध्या हा वैद्यकीय कचरा नगर परिषदेच्या कचरा गाड्यांमध्ये टाकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. औषधेही बाहेरून आणण्यास सांगतात. आयसीयू, एनआयसीयूची सुविधा नाही. लिफ्टची सुविधा नाही. शवविच्छेदनगृह धूळ खात पडलंय. याबरोबरच विविध समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. त्या सर्व मान्य करून चुकांची लेखी कबुली ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली. यानंतर डॉ. जगदाळे यांनी स्थानिक स्तरावरच समस्या तातडीने सोडवण्यात येतील. तसेच वरिष्ठ पातळीवरील समस्या पंधरा दिवसांत सोडवू, असे लेखी दिले. नम्रता गवारी, अनघा पाठक, माया गायकवाड, डॉ. वैशाली साखरे, सुशांत कुटे, जनाबाई मल्लाव आदी उपस्थित होते.


एक्स-रे मशिन, सोनोग्राफी सेंटर हे तळमजल्यावर असावे, असा नियम सांगतो. मात्र या इमारतीत एक्स-रे मशिन पहिल्या मजल्यावर आहे. ज्या खोलीत मशिन आहे, ती खोली अडचणीची आहे. सोनोग्राफी मशिनसाठी तर खोलीच नाही.
एक वर्षापूर्वी एका कंपनीने या रुग्णालयाला सोनोग्राफी मशिन दिले, मात्र यास कॉम्प्युटर, प्रिंटर, सॉफ्टवेअर नसल्याने मशिनचा वर्षभर वापरच केला नाही. खासगी सोनोग्राफी सेंटरचा धंदा कमी होऊ नये, म्हणून हे मशिन बंद ठेवण्यात आल्याचा आरोप पाचंगेंनी केला.
गरिबांना मोफत प्रसूतीची सुविधा मिळावी, या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. मात्र गर्भवतींना मोफत जेवणाची सोय आहे. ती सोयही या रुग्णालयात बंद आहे.

Web Title: Shinoor Hospital's Panchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.