शिरष्णे ग्रामपंचायतीने विनापरवाना झाडे तोडली
By admin | Published: March 26, 2017 01:15 AM2017-03-26T01:15:19+5:302017-03-26T01:15:19+5:30
शिरष्णे (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील झाडे ग्रामपंचायतीने विनापरवाना तोडलेली
सांगवी : शिरष्णे (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील झाडे ग्रामपंचायतीने विनापरवाना तोडलेली आहेत. तसेच ही तोडलेली झाडे विकून २६ हजार रुपये आले होते. शिरष्णेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य आदींनी त्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप माजी सरपंच शंकर खलाटे यांनी केला आहे.
यामध्ये ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा दत्तात्रय वाघमारे, उपसरपंच दीपाली कृष्णात खलाटे, ग्रामसेवक रवींद्र गोपाळराव माळशिकारे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावपातळीवर व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच झाडे तोडली आहेत. सध्या तोडलेल्या झाडाला पालवी फुटली आहे. यामध्ये चिंच, निलगिरी, लिंबाची झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे फेब्रुवारी-मार्च २०१६च्या दरम्यान विनापरवाना तोडण्यात आली होती. याबाबत शिरष्णेचे माजी सरपंच शंकर खलाटे यांनी वनविभागाकडे तक्रार दिली होती.
या वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शाळेच्या आवारात भेट देऊन तोडलेल्या झाडाची पाहणी केली होती. तसेच बारामती तहसीलदार, पोलीस ठाण्याकडे खलाटे यांनी लेखी निवेदन देऊन तक्रार नोंदवली होती. परंतु, इतके दिवस उलटूनदेखील वनविभागाचे अधिकारी याची कोणतीच दखल घेत नाहीत. प्राथमिक शाळेच्या आवारातील परवानगीशिवाय झाडे तोडल्यामुळे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर लवकर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी खलाटे यांनी केली आहे. (वार्ताहर)