शिरूरकरांना दोन दिवसांआड पाणी!
By admin | Published: April 2, 2016 03:26 AM2016-04-02T03:26:08+5:302016-04-02T03:26:08+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात (हत्ती डोह) पाणीसाठा घटल्याने पाण्याचे आवर्तन मिळेपर्यंत शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची
शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात (हत्ती डोह) पाणीसाठा घटल्याने पाण्याचे आवर्तन मिळेपर्यंत शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सभापती जाकीरखान पठाण यांनी दिली.
गेल्या पंधरवड्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आज पठाण, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, नगरसेवक महेंद्र मल्लाव, प्रवीण दसगुडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख भगवान दळवी यांनी हत्तीडोहला भेट देऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. या वेळी जॅकवेलची जाळी उघडी पडल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध पाणी आवर्तन येईपर्यंत पुरवायचे झाल्यास दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागेल, असे निदर्शनास आले. असे केल्यासच आवर्तन येईपर्यंत पाणी पुरू शकेल अशी परिस्थिती आहे. पाण्याच्या आवर्तनासाठी १५ मार्चलाच मागणी केली असून, १५ एप्रिलला आवर्तन सुटण्याची शक्यता आहे.
१५ एप्रिलला आवर्तन सुटल्यास बंधाऱ्यात २० एप्रिलपर्यंत पाणी पोहोचेल, असे पठाण यांनी सांगितले. या आढाव्यानुसार दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था निर्माण झालेली असताना बंधाऱ्यातून पारनेर बाजूने शेतीपंपाने शेतीसाठी पाणीउपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. यामुळेच पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. पारनेरच्या प्रांताधिकाऱ्यांना या शेतीपंपावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या शेतीपंपावर कारवाई करणे सध्याच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे.
पाणी काटकसरीने वापरा
दिवसाआडच्या रोटेशननुसार
शहराला उद्या (दि. २) पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सभागृहनेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी केले.