कोंढव्यातील कंपनीत शिरुन टोळक्याचा तुफान राडा; पाच जणांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 03:28 PM2021-07-11T15:28:56+5:302021-07-11T15:30:57+5:30
आईला कामावरुन काढून टाकल्याचा रागात दहशत पसरवून केली तोडफोड
पुणे: आईला कामावरुन काढून टाकल्याने साथीदारांना घेऊन कंपनीत शिरुन टोळक्याने कोयत्याने तोडफोड करुन दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
विकास राजेंद्र जानकर (वय २२, रा. येवलेवाडी, कोंढवा), केतन गंगाराम मोरे (वय २१, रा. पिसोळी), राजेश संभाजी चव्हाण (वय २६, रा. पिसोळी), सागर मुकुंद आहिरराव (वय २५), चेतन किशोर पाटील (वय २३, सर्व रा. पिसोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना कोंढव्यातील टाईनिंग को़ औद्योगिक वसाहतीत शनिवारी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी श्रीधर माधवराव नायडु (वय ६२, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
नायडु यांच्या कंपनीत सागर आहिरराव याची आई सरीता आहिरराव या पूर्वी कामाला होत्या. त्यांना कंपनीने कामावरुन काढुन टाकले होते. या कारणावरुन सागर याने आपल्या साथीदारांना घेऊन कंपनीत प्रवेश केला. कोयत्याने फिर्यादी यांच्या डाव्या हातावर मारले. त्याच्या साथीदारांनी हातामधील कोयत्याने कंपनीच्या कार्यालयामधील तीन केबीनच्या काचा फोडुन नुकसान केले. तसेच कोयते हवेत फिरवून कंपनीमधील कामगारांवर दहशत निर्माण केली. त्याला घाबरुन कामगार पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस तातडीने कंपनीत गेले. त्यांनी पाच जणांना अटक केली आहे.