शिरूरला २ दिवसाआड पाणी
By Admin | Published: June 19, 2016 04:36 AM2016-06-19T04:36:33+5:302016-06-19T04:36:33+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय
शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील बंधाऱ्यात जूनअखेर पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून, या कारणास्तव शहराला आजपासून २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.
बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी झाल्याने नगर परिषदेने १७ मार्चपासून (२०१५) शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने नगर परिषदेने बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या बंधाऱ्यातून पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.
या दरम्यान पाणीसाठा अत्यल्प झाल्याने नगर परिषदेने ३ एप्रिलपासून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. वरील भागातील बंधाऱ्यातून पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तेथील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, नगर परिषदेने प्रयत्न सोडला नाही. अखेर वरील बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने १७ एप्रिलला बंधाऱ्यात पाणी आले. हे पाणी आल्याने पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. नगर परिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार कालव्याद्वारे सोडलेले पाणी ५ मे रोजी बंधाऱ्यात पोहोचले. मात्र, याने अर्धाच बंधारा भरला. यानंतर पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
बंधाऱ्यात सध्याची परिस्थिती पाहता जूनअखेर पुरेल इतकेच पाणी उपलब्ध असल्याने आजपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय नगर परिषदेला घ्यावा लागला.
शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा
कुकडी कालव्याद्वारे आलेल्या आवर्तनातून पूर्ण बंधारा भरेल, अशी अपेक्षा होती. मात्र अर्धाच बंधारा भरला. यातच मार्च महिन्यापासून जेव्हा जेव्हा पाणी उपलब्ध झाले तेव्हा बंधाऱ्यातून पारनेरच्या हद्दीतील शेतकऱ्यांनी शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतीपंपाद्वारे पाणीउपसा केला.
यामुळे बंधाऱ्यात पिण्यासाठी असलेले पाणी झपाट्याने कमी झाले. पारनेरच्या महसूल अधिकाऱ्यांना नगर परिषदेने वेळोवेळी शेतीसाठी घेणारा पाणीउपसा बंद करण्याची मागणी केली. मात्र, या अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केले.