आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 05:59 AM2024-11-10T05:59:54+5:302024-11-10T06:02:09+5:30
अशोक पवार यांचे पुत्र ऋषीराज यांना विवस्त्र करण्यात आले. तसेच एका महिलेला बोलवून तिला ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले.
पुणे/शिरुर : शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार यांचे अपहरण करून एका बंगल्यात एका स्त्रीला बोलावून दोघांनाही तिथे विवस्त्र करून फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ॲड. असीम सरोदे आणि आम्रपाली अशोक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ऋषीराज पवार यांच्याबरोबर घडलेला प्रकार त्यांनी सांगितला.
ॲड. असीम सरोदे म्हणाले, शनिवारी (दि. ९) दुपारी ऋषीराज पवार हे त्यांच्या वडिलांचा प्रचार करीत होते. प्रचारादरम्यान त्यांच्याच कार्यकर्ता असलेला भाऊ कोळपे याने त्यांना आपल्याला एक छोटी बैठक घ्यायची असल्याचे सांगितले. त्यामुळे आपला कार्यकर्ता असलेल्या कोळपेवर विश्वास ठेवून ऋषीराज हे मांडवगण फराटा येथील एका गावात गेले. तेथे त्यांना एका खोलीत नेऊन कोळपे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी हात-पाय बांधून एका खोलीत कोंडले. नंतर ऋषीराज यांना विवस्त्र केले. तसेच एका महिलेला बोलवून तिला ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले. प्रतिसाद न दिल्यास तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली. ठार मारण्याच्या धमकीमुळे आरोपी सांगेल त्याप्रमाणे ऋषीराज यांनी फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी प्रतिसाद दिला. यावेळी ऋषीराज यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्हाला पुण्यातील एकाने यासाठी १० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे सांगितले. थोडावेळ असेच डांबून ठेवल्यानंतर ऋषीराज यांनी विनवणी केल्यानंतर अधिक पैसे देण्याचे आमिष दाखविले. शेजारील गावात माझे मित्र राहण्यास असून, त्यांच्याकडे पैसे ठेवले आहेत. असे सांगून ऋषीराज त्यांना दुसऱ्या गावातील वस्तीवर घेऊन गेले. यावेळी ऋषीराज यांनी आरोपीला आपल्या बोलण्यात गुंतवून आपला फोन काढून घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मेसेज करून झालेला प्रकार सांगितला. माझ्यासोबत असलेल्या कोळपेला पकडा असे सांगितले. तेथे गावात गेल्यावर कार्यकर्त्यांनी कोळपेला पकडले, तसेच त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी भाऊ कोळपे (रा. माडवगाणंफराटा, ता. शिरूर) याच्यासह संबंधित महिला व अन्य दोनजणांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक हणमंत गिरी करीत आहेत.
घडलेली घटना घृणास्पद : अशोक पवार
माझा मुलगा ऋषीराज पवार यांच्यावर जो प्रसंग घडला तो अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेमुळे मन बैचेन झाले आहे. निवडणुका लोकशाही पद्धतीने लढवायला हव्यात. असं कृत्य करून आमच्या कुटुंबाला वेठीस धरायचं आहे का अत्यंत निंदनीय गोष्ट असून, ज्यांनी कोणी केलं आहे. त्यांना काळ माफ करणार नाही. प्रचार करीत असताना हा माझ्यावर नाही, तर कुटुंबावर घात आहे. पोलिसांनी यामागील कोण सूत्रधार आहे याचा शोध घेतला पाहिजे, असे आमदार अशोक पवार यांनी लोणीकाळभोर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.