शिरूर भाजपा शहराध्यक्षनिवडीचा वाद चिघळला
By admin | Published: March 18, 2016 02:58 AM2016-03-18T02:58:20+5:302016-03-18T02:58:20+5:30
भाजपा शहराध्यक्षनिवडीच्या विरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रक काढल्याबद्दल तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे या कार्यकर्त्यांसह जिल्हा बँकेच्या
शिरूर : भाजपा शहराध्यक्षनिवडीच्या विरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी पत्रक काढल्याबद्दल तालुकाध्यक्ष भगवान शेळके यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे या कार्यकर्त्यांसह जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री पलांडे यांनी शेळकेंवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे शहराध्यक्षनिवडीचा वाद चिघळला आहे.
ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी संघर्ष केला, आंदोलने केली, ते अशा तक्रारींना घाबरणार नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांवर हा चाललेला अन्याय असल्याचे पलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भाजपाच्या शहराध्यक्षपदी केशव लोखंडे यांची निवड करण्यात आली. ही निवड करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असे म्हटले जाते. २१ वर्षांच्या मुलाच्या हाताखाली काम करणार नाही. या निवडीचा फेरविचार करावा, अन्यथा पक्षत्याग करू, अशा आशयाचे पत्रक माजी शहराध्यक्ष ललित नहार, उपाध्यक्ष प्रवीण मुथा, दिनकर भुजबळ यांनी नाव न टाकता काढले होते. जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांच्या पूर्वसंमतीशिवाय त्यांच्या नावाने पक्षाची बदनामी करणारे पत्रक काढणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार तालुकाध्यक्ष शेळके यांनी पोलिसांत केली. निवडीचा विरोध करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. यात पक्षाची प्रतिमा मलीन होण्याचा संबंधच नाही. हा एकप्रकारचा अपरिपक्वपणा आहे, अशी टीका नहार यांनी केली.
दरम्यान, काल (ता.१६) माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भुजबळ व तालुकाध्यक्ष शेळके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवर जुन्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला. बैठकीला निवडक कार्यकर्त्यांचीच उपस्थिती असल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला. यामुळे बैठक निष्फळ ठरल्याचेही काहींचे म्हणणे होते. एकंदरीत शहराध्यक्षनिवडीचा वाद वाढत चालल्याचे चित्र असून, शहराध्यक्ष फेरनिवडीसाठी जुन्यांचा दबाव वाढत आहे. शहराध्यक्ष निवडीच्या विरोधातील पत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट व जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांना पाठविण्यात आली असून, निवडीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाचे कसलीही अपेक्षा न ठेवता काम केले. अशा निष्ठावंतांना डावलून पक्ष पुढे जाऊ शकणार नाही. गेली २५ वर्षे पक्षासाठी त्याग केलेल्या निष्ठावंतांना आता कुठे पक्षाची सत्ता आल्यावर न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, इतर पक्षांतून आलेली मंडळी पदे भोगत असून, सत्तेची फळे चाखताना दिसत आहेत. शहराध्यक्ष निवडताना जुन्या निष्ठावंतांना विश्वासात घेण्यात आले नाही, हे वास्तव तालुक्यातील पक्षाचे नेते वरिष्ठांपर्यंत पोहचू देणार नाहीत म्हणून त्यांनी पत्रक काढले. न्याय देण्याऐेवजी त्यांच्यावरच बेकायदेशीरपणे पोलिसात तक्रारी दिल्या जात आहेत. यामुळे पक्षाची हानी होणार आहे, असे पलांडे म्हणाल्या़