शिरूर तालुक्यातील 'तो' भाजप सरपंच पुन्हा एकदा पोलिसांच्या 'रेकॉर्ड' वर; कुटुंबावरच गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 06:51 PM2020-08-28T18:51:24+5:302020-08-28T19:02:04+5:30
शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोरगे याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक माहितीसमोर
पुणे : पोलिसांकडे विविध गुन्हे दाखल असलेला,विविध बँकांचे कर्ज थकविल्यामुळे नोटीसा बजावण्यात आलेला शिरूर तालुका भाजपाध्यक्ष व टाकळी भीमा गावचा सरपंच असलेला रवींद्र दोरगे पुन्हा पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे.यावेळी त्याच्यासह त्याचे कुटुंब देखील अडचणीत आले आहे. सरपंचासह त्याच्या पत्नी आणि वडिलांनी जमीन व्यवहार फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तळेगाव ढमढेरे येथील जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोरगे याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. यामध्ये फसवणुकीसारख्या विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. नव्याने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे सरपंच रवींद्र दोरगे पुन्हा एकदा परिसरात व राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी रवींद्र दोरगे याच्याविरोधात विविध बँकांचे कर्ज थकविल्यामुळे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.तसेच शिक्रापुर पोलिसांना अनेक गुन्ह्यात मात्र, गेल्या काही दिवसांपासून सरपंच दोरगे हा फरार होता. अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होऊन देखील शिक्रापूर पोलिसांकडून या सरपंचाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.नव्याने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तळेगाव ढमढेरे येथील दीपक आल्हाटयांची जागा विकत घेऊन खरेदीसाठीचे म्हणून दिलेले धनादेश बाउन्स झाले आहे. यानंतर जमिनीच्या मालकांनी पैशाची मागणी केली पण ते देण्यास दोरगे याने चालढकल केली. तसेच धक्कादायक बाब म्हणजे रवींद्र याने त्या जागेची परस्पर दुसऱ्याला विक्री देखील केली. त्यानंतर आल्हाट यांनी दोरगे याच्याकडे पैशांची मागणी केली असता जातिवाचक शिवीगाळ केली.