मतदार नोंदणीसाठी हवेली तहसीलदारांच्या पत्राचा शिरुरमध्ये गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 06:26 PM2017-10-31T18:26:31+5:302017-10-31T18:31:37+5:30

शिरूर विधानसभा मतदार यादीत वाघोलीतील तीन ते साडे तीन हजार नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे लावण्यात आला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी केले आहे.

Shirur Haveli Tahsildar letter misuse for voter registration | मतदार नोंदणीसाठी हवेली तहसीलदारांच्या पत्राचा शिरुरमध्ये गैरवापर

मतदार नोंदणीसाठी हवेली तहसीलदारांच्या पत्राचा शिरुरमध्ये गैरवापर

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन मतदार नोंदणी करण्याकरिता जुलै-आॅगस्ट महिन्यात राबविण्यात आली होती विशेष मोहीम यामध्ये लाखो रुपयांची आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा रामदास दाभाडे यांचा आरोप

वाघोली : जुलै महिन्यामध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमध्ये हवेली तहसीलदारांच्या पत्राचा गैरवापर करून शिरूर विधानसभा मतदार यादीत वाघोलीतील तीन ते साडे तीन हजार नावे बोगस कागदपत्रांच्या आधारे लावण्यात आला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी केले आहे. शिरूर तहसीलदार कार्यालयातील व वाघोली तलाठी कार्यालयातील अधिकार्‍यांना हाताशी धरून बनावट लाईट बिल, इंडेक्स २ व इतर कागदपत्रामध्ये फेरफार करून बोगस मतदार नोंदणीचा प्रकार केला असून यामध्ये लाखो रुपयांची आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे.
प्रशासनाच्या वतीने नवीन मतदारांची नोंदणी करण्याकरिता जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती. नवीन मतदारांची नोंदणी झाल्यानंतर विधानसभेची प्रारूप यादी ३ आॅक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये वाघोलीत सुमारे साडेतीन हजार नावे समाविष्ठ झाली असल्याचे निदर्शनास आले. वाघोलीमध्ये बीएलओचे काम करणार्‍यांनी तलाठी कार्यालयाकडे नवीन मतदारांच्या नाव नोंदणीसाठी अर्ज दिले होते. बीएलओ यांनी तलाठी यांच्याकडे दिलेली नावे मतदार यादीतसमाविष्ट होण्याऐवजी इतरत्र ३४०० नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे समजले.
वाघोलीच्या तलाठ्यांनी हवेलीच्या तहसीलदारांचे पत्र सोबत जोडून मतदार नोंदणी अर्जांचा गठ्ठा तलाठी कार्यालयातील एका खाजगी इसमामार्फत शिरूर तहसील कार्यालयाकडे पाठविला होता. शिरूर तहसीलच्या निवडणूक शाखेने देखील आलेल्या अर्जांची तपासणी न करता ३०१८ मतदारांची नावे विधानसभा यादीमध्ये समाविष्ट केली. तलाठ्यांनी परस्पर पाठविलेल्या पत्राची व निवडणूक मतदार याद्यांची माहिती हवेली तहसील कार्यालयाला कळविली नाही. नवीन लावण्यात आलेल्या मतदारांचा मेळ लागत नसल्याने ग्रामस्थांच्या मनामध्ये संशयाची पाल चूकचुकली. शिरूर तहसील कार्यालयात जावून सदरच्या कागदपत्रांची तपासणी केली असता बनावट कागदपत्रे तयार करून नाव नोंदणी केली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी उघडकीस आणले आहे. बोगस नावे लावताना लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप दाभाडे यांनी केला आहे.


मतदार नोंदणी फॉर्मची शहानिशा नाही
वाघोलीतील तलाठी कार्यालयाकडून शिरूर तहसील निवडणूक शाखा कार्यालयाकडे अर्जांचा गठ्ठा एकत्रितपणे पाठविण्यात आला. गठ्ठ्यासोबत हवेली तहसील कार्यालयाचे पत्र सोबत जोडले असल्याने शिरूर तहसील कार्यालयाने गठ्ठा घेवून सदरची नावे हवेली तहसील कार्यालयाचे मंजूर/नामंजूर करावयाचे काम असल्याचे कारण देत अर्जाची कोणतीही तपासणी न करता सरसकट आलेल्या मतदारांची नावे विधानसभेच्या यादीमध्ये समाविष्ट केली. मतदार नोंदणी अर्जामध्ये फेरफार केलेले इंडेक्स २, बनावट लाईटबिल लावलेले आहेत याची शहानिशा देखील केली नाही.

 
अशी लागतात बोगस नावे
वाघोली परिसरामध्ये अनेक वर्षापासून भाडेकरू स्थानिक नागरिकांकडे वास्तव्यास असतात. भाडेकरूंची अथवा इतर व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये लागण्यासाठी स्थानिक नागरिक नवीन मतदारांचे आधारकार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स जमा करून त्यासोबत भाडेकरू व्याक्तीच्या नावाने बनावट फेरफार करून बनविलेले प्रॉपर्टी इंडेक्स २, लाईट बिल व इतर कागदपत्रे तयार करतात. सदरच्या झेरॉक्स प्रती मतदार नोंदणी अर्जासोबत जोडल्यानंतर नोंदणीशी संबंधित अधिकाºयांना आर्थिक देवाण-घेवाणीतून बांधले जाते. यानंतर अधिकारी व कर्मचारी अर्जांची तपासणी व मंजूर नामंजूर शेरा न मारता परस्पर नावे मतदार यादीमध्ये लावतात. वाघोलीतही हाच फंडा वापरून नावे लागल्याचे समोर आले आहे.


वाघोलीतील मतदार नोंदणी अर्जासोबत हवेली तहसील कार्यालयाचे पत्र असल्याने शिरूर कार्यालयाने ३०१८ नवीन नावे विधानसभा मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेली आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या नावांबाबत तक्रार दाखल झाली आहे. या नावांबाबत हवेली तहसील कार्यालयाने फेरतपासणी करून बोगस नावे आढळल्यास शिरूर कार्यालयाकडे पाठवावीत सदरची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील.
- रणजीत भोसले, तहसीलदार, शिरूर
 
प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये वाघोली येथील तलाठी कार्यालयातून शिरूर तहसील कार्यालयाकडे गेलेल्या नावांची यादी किंवा त्याबाबतची माहिती वाघोली तलाठी कार्यालयाकडून हवेली तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. हवेली तहसीलदारांच्या पत्राचा गैरवापर करून परस्पर मतदारांची नावे लावण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सर्वप्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधितांकडून खुलासा मागविण्यात येत आहे त्याचबरोबर हवेली तहसीलदारांच्या पत्राच्या गैरवापराचा तपास करण्यात येईल.
- सुनील शेळके, नायब तहसीलदार, हवेली
 
नवीन मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमामध्ये वाघोली गावातून सुमारे ३४०० नावे बोगसरित्या लावण्यात आलेली आहे. शिरूर तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी कोणतीही तपासणी किंवा मंजूर/नामंजूरचा शेरा न मारता नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट केली आहेत. बीएलओनी दिलेली नावे समाविष्ट होत नाहीत व इतर तीन हजाराहून अधिक नावे तपासणी न करता समाविष्ट होतात. म्हणजेच यामध्ये लाखोंची उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे अर्जासोबत जोडण्यात आलेली कागदपत्रे देखील फेरफार करून बनावट लावण्यात आलेली आहे. या अगोदरच्याच तीन हजार नावांचा तपास लागत नाही तोच आणखी तीन हजार नावे लागल्याने घोळ वाढत चालला आहे. याची चौकशी करून बोगस नावे वगळण्यात यावी.
- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
 
आमदारांचे चौकशीचे पत्र
शिरूर विधानसभा अंतर्गत वाघोली गावामध्ये बनावट कागदपत्रे जोडून बोगसरित्या मतदार यादीत लावण्यात आलेल्या साडेतीन हजार नावांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मुख्य निवडणूक आयोग व संबंधित यंत्रणांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
 
मतदार अनभिज्ञ
मर्जीतल्या लोकांची जास्तीत जास्त नावे मतदार यादीमध्ये लावण्यासाठी झपाटा इच्छुक उमेदवार लावत असतात. नावे लावण्यासाठी कागदपत्रे कमी पडत असल्यास बनावट कागदपत्रे तयार करून अर्ज पुढे दिले जातात. मात्र आपल्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून आपले नाव लागले असल्याची कल्पनाही नवीन मतदारांना नाही. मतदार यादीत नाव आले असल्याचा आनंद असला तरीही बनावट कागदपत्रांच्या रॅकेट पासून मतदार मात्र अनभिज्ञ आहे.

Web Title: Shirur Haveli Tahsildar letter misuse for voter registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.