आदल्या दिवशी भाजप उमेदवाराचा प्रचार अन् दुसऱ्याच दिवशी वंचितकडून उमेदवारी; मंगलदास बांदल कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 01:31 PM2024-04-03T13:31:58+5:302024-04-03T13:32:45+5:30
Mangaldas Bandal: दोन दिवसांपूर्वीच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत बांदल यांनी सहभाग घेतला होता.
Shirur Lok Sabha ( Marathi News ) : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी तिसरी उमेदवार यादी काल रात्री जाहीर केली. यातील पाच जागांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असून वंचितने शिरूरमधून मंगलदास बांदल यांना मैदानात उतरलं आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राहिलेले मंगलदास बांदल हे कायमच वादात राहिले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत बांदल यांनी सहभाग घेतला होता. मोहोळ यांच्या प्रचारासाठी वडगाव शेरी इथं आयोजित संवाद मेळाव्यात मंगलदास बांदल हे व्यासपीठावर उपस्थित होते. याच बांदल यांना वंचितने उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
पैलवान असलेले मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. मात्र विविध गुन्हे दाखल झाल्याने ते कायमच वादग्रस्त ठरले. जिल्हा बँकेत केलेल्या कथित फसवणूक प्रकरणी ते जवळपास पावणे दोन वर्ष तुरुंगात होते. मागील वर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्याआधीही फसवणूक, खंडणी, पाणीचोरी अशा विविध प्रकरणांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा वडगाव शेरीच्या मेळाव्यात संकल्प !
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) April 1, 2024
वडगाव शेरी येथे झालेल्या संवाद मेळाव्यास महायुती पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करुन विकसित… pic.twitter.com/la4NchqjQ6
बँक फसवणुकीचे नेमके काय होते प्रकरण?
शिरूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी बनावट खरेदी खताच्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून सव्वा कोटींचे कर्ज घेतले आणि त्याची परतफेड न करत एका नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी २६ मे २०२१ रोजी अटक केली होती. दत्तात्रय मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बांदल यांच्यावर कारवाई झाली होती. मंगलदास बांदल यांनी फिर्यादी मांढरे यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले. मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदी खत करून बांदल यांनी त्या आधारे शिवाजीराव भोसले बँकेतून आठ लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतः वापरले. त्यानंतर पुन्हा सदर मिळकतीवर कर्जाकरिता मांढरे यांचे कुलमुकात्यारपत्र व बोगस पुरवणी दस्त करून शिवाजीराव भोसले बँकेतून सव्वा कोटी रुपये कर्ज घेत तेही स्वतः साठी वापरले. त्याचे कर्ज हप्ते अडीच कोटी रुपयापर्यंत गेले आहे. या प्रकरणी फसवणूक झाली म्हणून मांढरे यांनी फिर्याद दिली होती.
मंगलदास बांदल यांच्याविरोधात विविध गुन्हा दाखल
एका सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन बळकावण्यासाठी त्रास देत व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली होती. तसंच व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात बांदल यांना अटक होऊन नंतर जामिनावर सुटका झाली होती.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने शिरूरची लढत तिरंगी होणार आहे. कारण या मतदारसंघातून यापूर्वीच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.