शिरूर नगर परिषद सर्वाधिक स्वच्छ
By admin | Published: March 5, 2016 12:36 AM2016-03-05T00:36:45+5:302016-03-05T00:36:45+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसंदर्भातील शिरूर नगर परिषदेचे काम अतिशय समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शासनाच्या हागणदारीमुक्त शहर तपसाणी पथकाचे
शिरूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीसंदर्भातील शिरूर नगर परिषदेचे काम अतिशय समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया शासनाच्या हागणदारीमुक्त शहर तपसाणी पथकाचे प्रमुख, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे प्रादेशिक संचालक व्ही. बी. निलावाड यांनी येथे व्यक्त केली. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ‘क’ वर्ग नगर परिषदेपैकी शिरूर नगर परिषद सर्वाधिक स्वच्छ व सुंदर असल्याचे कौतुकही निलावाड यांनी केले.
स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शिरूर नगर परिषदेला हागणदारीमुक्त योजनेत फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर पडताळणी करण्यासाठी शासनाचे पथक दोन दिवसांपूर्वी शहरात दाखल झाले. दोन दिवसांच्या तपासणीनंतर आज नगर परिषदेत नगरसेवकांसमोर निलावाड बोलत होते.
पथकातील सदस्य, परभणीचे उपायुक्त रणजित पाटील यांनीही हागणदारीमुक्तीबाबत चांगली परिस्थिती निर्माण केल्याचे म्हटले. नागरिकांशी संवाद साधला असता त्यांची मानसिकता बदलल्याचे निदर्शनास आले. प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी मिळून खंबीर भूमिका घेतल्याचे जाणवले, असे पाटील म्हणाले. नगरसेवक जाकीरखान पठाण व मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी हागणदारीमुक्तीबाबत माहिती दिली. पठाण म्हणाले, की ओरिजनल लोकसंख्येपेक्षा शहरात फ्लोटिंग लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. रांजणगाव एमआयडीसीमुळे यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सॅनिटरी, पाणीपुरवठा यांबाबत नगर परिषदेवर ताण पडतो, हागणदारीमुक्तीसाठी काम करणे आव्हानात्मक आहे. तरीही यशस्वीरीत्या या योजनेची वाटचाल सुरू आहे. डॉ. थोरात म्हणाले, की वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जात असून, ४०० हून अधिक शौचालये उभारली आहेत. ज्या पटांगणावर झाडे वाढल्याने आडोसा घेऊन हागणदारी वाढत होती, ती पटांगणे नगर परिषदेने साफ केली. सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती केली.
नगराध्यक्षा मनीषा गावडे, समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी प्रवीण शिंगटे, स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती रवींद्र ढोबळे, नगरसेवक संतोष भंडारी, महेंद्र मल्लाव, अशोक पवार, आबीद शेख, नगरसेविका उज्ज्वला बरमेचा, सुनीता कालेवार, सुवर्णा लटांबळे, सुवर्णा लोळगे, कविता वाटमारे, प्रा. प्रभुलिंग वळसंगे, तुकाराम खोले, प्रशांत शिंदे, डी. टी. बर्गे उपस्थित होते.