शिरूरला भाजपाचे तळ्यात-मळ्यात!

By admin | Published: November 18, 2016 06:02 AM2016-11-18T06:02:57+5:302016-11-18T06:02:57+5:30

नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा शिरूर शहर विकास आघाडीसोबत राहणार, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जाहीर केले असताना

Shirur is in the palace of BJP! | शिरूरला भाजपाचे तळ्यात-मळ्यात!

शिरूरला भाजपाचे तळ्यात-मळ्यात!

Next

शिरूर : नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपा शिरूर शहर विकास आघाडीसोबत राहणार, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी जाहीर केले असताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत शहराध्यक्षाने आज हालचाली सुरू केल्या. मात्र, भाजपा आघाडीसोबतच राहणार असल्याचा निर्णय पक्का असून, पक्षाच्या बैठकीत तशाच पद्धतीची रणनीती ठरली असल्याचे आमदार पाचर्णे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आमदार पाचर्णे यांनी आघाडीसोबत राहण्याबाबत घेतलेली ठाम भूमिका आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सुरू केलेली हालचाल पाहता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार पाचर्णे यांनी पक्षाच्या बैठकीत शहर विकास आघाडीबरोबर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्याचे धारिवाल यांच्या निवासस्थानी जाहीर केले होते. आज मात्र भाजपा कार्यकर्त्यांच्या वेगळ्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून आल्याने शहरात एकच चर्चा रंगली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी असताना भाजपाने पक्षस्तरावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. शहराध्यक्ष केशव लोखंडे म्हणाले की, पालकमंत्री बापट यांनी पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या चिन्हावर नगर परिषद निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. आजही भ्रमणध्वनीवर त्यांनी तशाच प्रकारच्या सूचना केल्या. आमदार पाचर्णे यांनीही फॉर्म भरा, असे सांगितले. यानुसार उद्या एबी फॉर्म मिळणार असून, नगराध्यक्षपद व २१ नगरसेवक पदांच्या जागा पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत आमदार पाचर्णे यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षाच्या मागे झालेल्या बैठकीत शहर आघाडीसोबत जाण्याचा
निर्णय घेण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्षही या निर्णयासोबत आहेत.
आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची रणनीती ठरवण्यात आली असून, हाच निर्णय पक्का आहे. पक्षाच्या आमदाराचा स्थानिक निवडणुकीतील आघाडीसोबत राहण्याचा निर्णय ठाम आहे, तर दुसरीकडे पक्षाचे शहराध्यक्ष
म्हणत आहेत की, पालकमंत्री व आमदार या दोघांनीही पक्षाच्यावतीने सर्व जागांवर अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.
यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपा आघाडीसोबत राहतो की स्वबळावर लढतो, हे स्पष्ट होईल.
आघाडीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात आमदार समर्थकांनीही मुलाखती दिल्या आहेत. आमदारांनी त्यांची इच्छुकांची यादीही आघाडीचे नेते प्रकाश धारिवाल यांच्याकडे सुपूर्त केली आहे. अशात यातून २१ नावे जाहीर होण्याची शक्यता असताना भाजपाने घेतलेल्या निर्णयाने आज आघाडी कशा पद्धतीने आघाडीची नावे जाहीर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आघाडीच्या वतीने उद्या उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
(वार्ताहर)

Web Title: Shirur is in the palace of BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.