शिरूर पालिका ॲक्शन मोडमध्ये, अतिक्रमणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:19+5:302021-01-04T04:10:19+5:30
शहरात झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार अशोक पवार यांनी ...
शहरात झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्या पार्श्वभूमीवर आमदार अशोक पवार यांनी पालिका आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये शहरातील विविध समस्यांबरोबरच वाढते अतिक्रमण आणि पार्किंग मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली. आमदार पवार यांनी अतिक्रमणांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या होत्या. एवढेच नाही तर कोणाचेही अतिक्रमण असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशीच भूमिका पवार यांनी मांडली. पोलीस प्रशासनालाही पार्किंग समस्येवर ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
बैठकीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. पालिकेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जुन्या नगर पुणे रोडवर वाहतूककोंडी होणाऱ्या भागातील बसस्थानकासमोरील फळवाले, फुलवाले यांचे स्टॉल असणारे अतिक्रमण काढले. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचेही पालिका प्रशासनाने सांगितले. यासंदर्भात बोलताना पालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, शहरात दिवसेंदिवस वाहतूककोंडी वाढत चालली आहे. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही मोहीम अशीच सुुरू राहणार आहे. दरम्यान, रस्त्याकडेला अस्ताव्यस्त पार्किंगवरही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
कारवाई पथकात शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलीस निरीक्षक मोटे आदींचा समावेश होता.
०३ शिरुर
शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना पालिकेचे कर्मचारी