शिरूरला मतदान शांततेत

By admin | Published: February 22, 2017 01:54 AM2017-02-22T01:54:25+5:302017-02-22T01:54:25+5:30

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज ७५.६४ टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता निवडणूक

Shirur polling peaceful | शिरूरला मतदान शांततेत

शिरूरला मतदान शांततेत

Next

शिरूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज ७५.६४ टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता निवडणूक शांततेत पार पडली. तालुक्यातील २ लाख ३७ हजार ७०४ मतदारांपैकी १ लाख ७९ हजार ८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांवर भर उन्हातही मतदारांच्या, विशेषत: महिलांच्या रांगा दिसून आल्या. अनेक ठिकाणी मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. मतदानाची वेळ संपल्यानंतर राजकीय अंदाज, त्यावरची चर्चा सुरू झाली. मात्र मतदारराजाने मतपेटीत कोणाला दान टाकले हे २३ फेब्रुवारीलाच समजेल.
आज सकाळी साडेसात वाजता तालुक्यातील २६५ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. उन्हाळा असल्याने ऊन डोक्यावर येण्याआधी म्हणजेच सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदार मतदान केंद्रांवर रांगा लावतील अशी अपेक्षा होती. मात्र सकाळी साडेनऊपर्यंत केवळ ८ टक्के मतदान झाले. साडेअकरापर्यंत यात वाढ होऊन २३ टक्के मतदान झाले. यानंतर म्हणजे बारानंतर रांगा कमी होतील असे वाटत होते. मात्र मतदार भर उन्हातही मतदानासाठी बाहेर पडताना दिसले. दुपारी दीड वाजेपर्यंत ४०.९३ टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांची काळजी घेण्यात आली. त्यांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली. यामुळे मतदारांच्या रांगा काही कमी झाल्या नाहीत. यामुळे दुपारी साडेतीनपर्यंत ५३.०८ टक्के मतदान झाले. करडे मतदान केंद्रावर या वेळेपर्यंत ६९ टक्के मतदान झाले होते. साडेतीननंतरही मतदारांच्या रांगा कायम होत्या. शेवटच्या दोन तासांत २२ टक्के मतदान झाले होते. कोरेगाव-भीमा, सणसवाडी मतदान केंद्रांवर संध्याकाळी सातपर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. मिनी विधानसभा निवडणुकीचे स्वरूप असणाऱ्या या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांची खऱ्या अर्थाने तालुक्यात काय ताकद आहे हे २३ फेब्रुवारीला समजेलच, मात्र अंदाजच्या आखाड्याने वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच मतदान केंद्रांवर उमेदवारांचे समर्थक, पक्षांचे कार्यकर्ते होते. आपलाच उमेदवार निवडून येणार हे ते आत्मविश्वासाने सांगत होते. आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार या दोन आजी-माजी आमदारांच्या दृष्टीने ही मिनी विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून, या दोघांनीही यश मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. पाचर्णे यांनी सर्व गटांवर, गणांवर लक्ष केंद्रित करतानाच आपल्या चिरंजीवाच्या गटावर (शिरूर ग्रामीण-न्हावरे) विशेष नजर ठेवली. अण्णापूर येथे काही मतदारांवर आक्षेप घेण्यात आला. त्यांना मतदान करण्यास मज्जाव करण्यात आला. या वेळी स्वत: आमदार पाचर्णे तेथे उपस्थित होते. या गटात एकूण ७५ टक्के मतदान झाले.
माजी आमदार अ‍ॅड. पवार यांनीही शिरूर ग्रामीण न्हावरे गटात आपली शक्ती पणाला लावली. पवार यांचे सहकारी बाजार समितीचे संचालक राजेंद्र जासूद यांनी या गटात जोर लावला. त्यांनीही आपली ताकद पणाला लावली. यामुळे या गटाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असेल. अ‍ॅड. पवार यांची पत्नी पं. स. सदस्या सुजाता पवार या वडगाव-रासाई-मांडवगण फराटा गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. त्यांच्याविरोधात आमदार पाचर्णे यांचे खंदे सहकारी दादापाटील फराटे यांची पत्नी छाया फराटे यांचे आव्हान होते. या गटात सरासरी ७५ टक्के मतदान झाले.
कारेगाव-रांजणगाव गणपती गटात ८१ टक्के मतदान झाले. माजी जि. प. सदस्य शेखर पाचुंदकर यांची भावजय स्वाती पाचुंदकर यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी होती. त्यांच्याविरूद्ध पं. स. सदस्या मनीषा पाचंगे यांची भाजपातर्फे उमेदवारी होती. या दोघींत सरळ लढत झाली. पाचुंदकरांना विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अ‍ॅड. पवार यांनी ताकद दिली. यामुळे या गटाच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. (वार्ताहर)

Web Title: Shirur polling peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.