शिरूर लोकसभेची जागा भाजपाला द्यावी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:07 AM2019-01-21T02:07:23+5:302019-01-21T02:07:58+5:30
मागील १५ वर्षांत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही भरीव काम केले नाही.
मंचर : मागील १५ वर्षांत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही भरीव काम केले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली असून हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विकास रासकर यांनी केली. शिवसेना-भाजपा युती झाल्यास ही जागा सेनेला गेल्यास येथील उमेदवार बदलण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रासकर म्हणाले ३ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आढळराव पाटील यांनी अपेक्षित कामे केलेली नाहीत.मतदारसंघात प्राधान्य क्रमाने जी कामे अपेक्षित आहेत ती झालेली नाही.
वाघोली- शिक्रापूर परिसरात वाहतुक कोंडी कायम आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आढळराव पाटील स्ट्रॉग भूमिका घेत नाही. अष्टविनायक तसेच भिमाशंकर रस्त्याचे रुंदीकरण झाले नसून पुणे- नाशिक महामार्ग रखडला आहे.
खेड तालुक्यातील विमानतळ केवळ आढळराव पाटील यांच्यामुळे पुरंदरला गेले असा आरोप करुन रासकर म्हणाले विमानतळ होण्यासाठी कोणतीही बाधा नव्हती. परंतू आढळराव पाटील यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे विमानतळ होवू शकले नाही. शिरुर लोकसभा मतदार संघ भाजपा ला मिळावा अशी मागणी आम्ही केली आहे.
या मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपाचे ३ आमदार व असंख्य नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ मिळाला पाहिजे. भाजपा येथून प्रबळ उमेदवार देणार असून मी स्वत: दावेदार असल्याचे रासकर यांनी सांगितले.