शिरूरला मंदिराचा कळसच चोरला
By admin | Published: April 28, 2017 05:50 AM2017-04-28T05:50:59+5:302017-04-28T05:50:59+5:30
शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री रामलिंगमहाराज मंदिराचा कळस रात्री चोरीला गेला. सोन्याचा मुलामा दिलेला हा कळस आहे
शिरूर : शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री रामलिंगमहाराज मंदिराचा कळस रात्री चोरीला गेला. सोन्याचा मुलामा दिलेला हा कळस आहे. मात्र, मंदिराचा कळसच चोरीला गेल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. साडेतीन वर्षांपूर्वी याच मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली होती.
शिरूरपासून तीन किलोमीटर अंतरावर शिरूर-भीमाशंकर रस्त्यावर रामलिंग महाराजांचे मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. लाखो भाविक या यात्रेला हजेरी लावतात. या मंदिराचा सोन्याचा मुलामा दिलेला कळस चोरीला गेल्याचे प्रथम सुरक्षारक्षक नामदेव दौंडकर यांना दिसले. त्यांनी ही बाब रामलिंग ट्रस्टचे विश्वस्त वाल्मीकराव कुरंदळे यांना कळविली. कुरंदळे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या तसेच विजेच्या वायरी चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी तोडल्याचे निदर्शनास आले. पहाटे एक ते चारच्या दरम्यान मंदिर परिसरात अंधार करून चोरट्यांनी चोरीच्या घटनेस अंजाम दिला. मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या खोलीवर चढून चोरट्यांनी प्रवेश केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे हे मध्यरात्री दोन वाजून ५६ मिनिटांनी बंद झाल्याचे माजी सरपंच अरुण घावटे यांनी सांगितले. या दरम्यान चोरी झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. साडेतीन वर्षांपूर्वी चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूनेच प्रवेश करून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम घेऊन पसार झाले होते. गुप्तदान असल्याने त्यातील रकमेचा तपशील मिळाला नव्हता. दानपेटीतील रक्कम काढून दानपेटी तोडून फोडून मंदिराजवळ टाकून देण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नसताना कळसच चोरीला गेल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.