शिरूर तालुका झालंय जंगल; बिबट्या, तरसानंतर आता शेतकऱ्यांवर कोल्ह्याचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 09:19 AM2023-05-02T09:19:11+5:302023-05-02T09:19:24+5:30
एक महिला आणि दोन शेतकऱ्यांना चावा घेतल्याने जखमी
मलठण : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तामखरवाडी चे शेतकरी दसरथ मारुती मुंजाळ (वय 70), पूजा विनोद कळकुंबे (वय 25), सुरेश मारुती चोरे (वय 40) या तीन शेतकऱ्यांवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला झाला आहे. हा कोल्हा पिसाळलेला असावा असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
पूजा कळकुंबे ही कांद्याच्या शेतात कांदे काठत असताना अचानक कोल्हयाने पूजा हिच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला, तिथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा करताच कोल्ह्याने धूम ठोकली. काही वेळातच दशरथ मुंजाळ हे शेतात गवत कापत असताना त्यांच्या हाताला चावा घेतला. पुन्हा तासभरात सुरेश चोरे यांना पायाला चावा घेतला. त्यांना टाकळी हाजी येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन प्राथमिक स्वास्थ्य केंद्रावर नेले असता तिथे उपचार करून सर्वाना पुढील उपचारासाठी शिरूर येथे पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच माजी सरपंच दामुआण्णा घोडे, सरपंच अरुणा घोडे, सोसायटीचे संचालक संतोष गावडे यानी रुग्णालयात जावून रुग्णांची भेट घेतली .