शिरूरकर दररोज रिचवतात २५ हजार लिटर दारू! संजय पाचंगे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 01:45 AM2017-12-10T01:45:30+5:302017-12-10T01:45:39+5:30
शिरूर तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींनी संपूर्ण दारूबंदीचे ठराव करूनही तालुक्यात दररोज तब्बल २५ हजार लिटर दारूविक्री होत असल्याचा दावाही क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींनी संपूर्ण दारूबंदीचे ठराव करूनही तालुक्यात दररोज तब्बल २५ हजार लिटर दारूविक्री होत असल्याचा दावाही क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला असून तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारूधंद्यांवर कारवाईच होत नाही. याच्या निषेधार्थ तसेच कारवाई न करणाºया संबंधित विभागाच्या अधिकाºयांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पाचंगे १२ डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे पाचंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाचंगे यांनी ९ आॅगस्ट २०१६ पासून तालुक्यात दारूबंदी अभियान सुरू केले आहे. त्यांच्या या अभियानाला प्रतिसाद म्हणून १५ आॅगस्ट २०१६ ला तालुक्यातील ९३ ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव करण्यात आले. ६० हजार नागरिकांनी दारूबंदी अभियानाच्या समर्थनार्थ स्वाक्षºया केल्या. मात्र याबाबत उत्पादन शुल्क तसेच तालुक्यातील प्रशासनाने कारवाई केली नाही, असा आरोप पाचंगे यांनी केला. ते म्हणाले, तालुक्यात शिरूर रांजणगाव व शिक्रापूर या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५० अवैध हॉटेल्स, ढाबे व टपºयांतून बाटलीबंद दारूची अवैधरित्या विक्री होते. २०० पेक्षा जास्त गावठी दारूचे अड्डे आहेत. २५० ढाबे, हॉटेल्समधून सर्रासपणे विक्री केली जाणारी दारू ही बनावट असून या बनावट दारूचे रॅकेट असून तालुक्यातील एक राजकीय व्यक्ती याचा मास्टर माइंड आहे.
या रॅकेटमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय व्यक्ती सामील असून याबाबतची माहिती काही पोलीस अधिकाºयांकडूनच मिळाल्याचे पाचंगे यांनी सांगितले. या बनावट
दारूच्या रॅकेटची प्रचंड दहशत
असून कारवाई कराल तर याद राखा, अशी धमकी पोलीस अधिकाºयांनाच मिळत आहे. वरिष्ठांकडूनच या रॅकेटवर अजिबात कारवाई न करण्याचा आदेश पोलिसांना मिळत आहे. यामुळे पोलीस कारवाईची हिम्मत करीत नाहीत.
पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी
‘दारूबंदी’चे आंदोलन थांबव नाहीतर नाशिकच्या अधिका-याला जाळले तसे पेट्रोल टाकून जाळू, अशी धमकी ६ डिसेंबर रोजी पाच अनोळखी व्यक्तींनी दिल्याचे सांगितले.
६ डिसेंबरला पाचंगे शिक्रापूरहून शिरूरला येत असताना कासारी फाट्याजवळ ते काही कामानिमित्त थांबले असता दोन काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पाचजण त्यांच्याजवळ आले.
एकाने शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर दुसºयाने थेट जाळून मारण्याची धमकी दिल्याचे पाचंगे यांनी सांगितले.