शिरवळ - उद्योगांसाठी ‘न्यू डेस्टिनेशन’
By admin | Published: May 17, 2014 05:58 AM2014-05-17T05:58:03+5:302014-05-17T05:58:03+5:30
उद्योगांसाठी ‘न्यू डेस्टिनेशन’ शिरवळमधून जाणार्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीचे जाळे, मुबलक प्रमाणात पाणी व पुरेशी जमीन उपलब्ध
शिरवळमधून जाणार्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीचे जाळे, मुबलक प्रमाणात पाणी व पुरेशी जमीन उपलब्ध, केंद्र शासनाने सेझ जाहीर केला, माफक दरात लागणारे पुरेसे कामगार यांमुळे गेल्या ४ वर्षांत शिरवळला व परिसरात ११४ कंपन्या उभारल्या गेल्या. यातून जमिनीचे भाव गगनाला भिडले. कामगारांमुळे मोठमोठे रेसिडेन्शियल टॉवर (इमारती) उभ्या राहिल्या. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खंडाळा तालुक्यात केसुर्डी या ठिकाणी केंद्र शासनाने सेझ जाहीर केल्यावर व राज्य सरकारने केसुर्डी परिसरात औद्योगिक वसाहत जाहीर केल्यावर खंडाळा तालुक्याची औद्योगिक प्रगती झपाट्याने झाली. जमिनीच्या किमती कोहिनूर हिर्यापेक्षाही अधिक होऊ लागल्याने एजंटांचा सुळसुळाट झाला. बाहेर राज्यात, जिल्ह्यात राहणारा शेतकरी शोधून त्याच्या जमिनीची विक्री झाली. पुणे-बंगळुरू महामार्ग होण्यापूर्वीच शिरवळ व महामार्गाच्या आसपासच्या गावांतील शिंदेवाडी, विंग येथील डोंगरच्या डोंगर कंपनीने खरेदी केले. महामार्गामुळे राज्यासह परराज्यांतील वाहतुकीचा प्रश्न सुटला. महामार्ग जवळ असल्याने वाहतूक कमी, नीरा नदीमुळे मुबलक प्रमाणात पाणी; शिवाय हातपंप लिफ्टचा वापर करून पाणी मिळाले, नीरा-देवघर, धोम-बलकवडी धरणांच्या कालव्याचे पाणी भविष्यात मिळणार आहे. कमी किमतीत जमिनी उपलब्ध झाल्या. यामुळे शिरवळ, देवघर, शिंदेवाडी विंग, केसुर्डी परिसरात विविध प्रकारच्या ११४ कंपन्या उभारल्या गेल्या. यात ए.सी.जी. वर्ल्ड वाईड ग्रुपच्या फार्मास्युटिकल कंपन्या, गोदरेज, रियटर, फिनोलेक्स जे पॉवर, हॅल्डफार्मा, एशियन पेंट, निप्रो, मोट्रोगॉन, पूना कन्स्ट्रक्शन मशिनरी प्रा. लि., डब्ल्यू आय कॅप्सुल अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध प्रकारच्या ११४ कंपन्या उभ्या राहिल्या. या कंपन्यांमुळे लहान-मोठे उद्योग-व्यवसाय वाढीला लागले. साधारणपणे एका कंपनीत अधिकारी व कर्मचारी धरून ४०० ते ५०० कामगार काम करतात. यांमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात येथील कामगारांचा समावेश आहे. दिवसेंदिवस इमारती वाढत आहेत. बांधकाम व्यावसायिक गाळ्यांची किंमत ४,५०० रुपये स्क्वेअर फूट, तर रेसिडेन्शियल राहण्याची ३,४०० रुपये स्क्वेअर फूट आहे. जवळ-जवळ पुण्याचे दर इथे सुरू आहेत. कंपनीतील कामगार किंवा अधिकारी शिरवळपासून १० ते १५ किलोमीटरवर कामाला जात असला, तरी राहण्यास तो शिरवळलाच येतोय. बांधकाम व्यावसायिक प्लॉट्स, व्यापारी गाळे यांच्यासह बंगलो प्लॉट किंवा बंगलोही बांधून विक्री होत आहे. यातून स्टार सिटी, आॅरस आभा, स्नेहांगण, शुभंकर यासारखे मोठे प्रोजेक्ट उभे राहिले आहेत. भविष्यात यात वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणार्या किमतींमुळे अनेक जण जागा, बंगलो, फ्लॅट यांत गुंतवणूक करीत आहेत.